शाळा कोसळल्याने 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू
राजस्थान राज्यातील झलवारमध्ये भीषण दुर्घटना
वृत्तसंस्था / जयपूर
राजस्थानातील झलवार येथील एका खेड्यात प्राथमिक शाळेची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत किमान 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अद्याप, 60 हून अधिक विद्यार्थी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. त्यांना वाचविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. आपत्कालीन साहाय्यता दले आणि स्थानिक नागरीक यांच्या साहाय्याने ढिगारा हटविण्याचे काम करण्यात येत आहे. या दुर्घटनेसंबंधात 10 शिक्षक आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी पिपलोदी प्राथमिक शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शाळेचे छप्पर अचानक कोसळले. यावेळी शाळेत 60 हून अधिक विद्यार्थी शिकत होते. ते सर्व ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. काही विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, अजूनही धोका टळलेला नाही. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती राजस्थान प्राथमिक शिक्षण विभागाकडून शुक्रवारी दुपारी देण्यात आली.
शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे जीवीतहानी
शाळेचे छप्पर ढासळत आहे, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे केली होती. त्याचवेळी विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढले असते, तर जीवीत हानी टळली असती. तथापि, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत त्यांच्यावर शाळेतच बसण्याची सक्ती केली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले, असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. त्यामुळे 10 शिक्षक आणि अधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती शाळा व्यवस्थापनाने आणि सरकारने दिली.
पंतप्रधान मोदी यांना दु:ख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेसंबंधी शोक व्यक्त केला आहे. ही दुर्घटना अतिदु:खदायक आहे. संकटाच्या या घडीला दुर्घटनाग्रस्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक, तसेच कुटुंबिय यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी मी प्रार्थना करतो. दुर्घटनाग्रस्तांना शक्य तितके सर्व साहाय्य करा, असा आदेश देण्यात आला आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भावना संदेशाद्वारे व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या हृदयद्रावक दुर्घटनेसंबंधी शोक व्यक्त केला आहे.
अतिपावसामुळे दुर्घटना
या दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. राजस्थानात गेले काही दिवस मुसळधार वर्षा होत आहे. या शाळेची इमारत जीर्ण झालेली होती. अतिपावसामुळे ती अधिकच खचली आणि ही दुर्घटना घडली, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता शाळेत शिक्षणाच्या कार्याला प्रारंभ झाल्यानंतर अकस्मात तिचे छप्पर विद्यार्थ्यांवरच कोसळले. आजूबाजूला राहणारे स्थानिक त्वरित घटनास्थळी एकत्र झाले आणि त्यांनी त्यांच्या परीने शाळेचा ढिगारा हटविण्यास प्रारंभ केला. या त्यांच्या तत्परतेमुळे काही विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. या दुर्घटनेचे वृत्त कळतात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने आपले दल तेथे पाठविले. राजस्थान सरकारच्या आपत्ती निवारण दलानेही त्वरित बचाव कार्याला प्रारंभ केला, अशी माहिती देण्यात आली.
इमारतीचे बांधकाम 20 वर्षांपूर्वी
या शाळेची स्थापना 1955 मध्ये करण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्था या शाळेचे व्यवस्थापन पहात आहे. या शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण 20 वर्षांपूर्वी करण्यात आले होते, अशी सूत्रांची माहिती आहे. या शाळेची स्लॅब दगडांपासून बनविण्यात आली होती. त्यामुळे या दुर्घटनेची तीव्रता वाढली आहे. शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर स्लॅबचे दगड कोसळले, असे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री यांचा शोकसंदेश
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेसंबंधी तीव्र दु:ख व्यक्त केले असून जखमींवर चांगल्यातले चांगले उपचार करा, अशी सूचना प्रशासनाला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही दुर्घटना अंत:करण हेलावणारी असून तिची सखोल चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ते शनिवारी झलवार येथील रुग्णालयाला आणि घटनास्थला भेट देतील, अशी शक्यता आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही दु:ख व्यक्त केले असून जखमींना लवकरात लवकर बरे वाटो, अशी प्रार्थना असल्याचा संदेश त्यांनी दिला आहे.
बचावकार्य युद्धपातळीवर...
ड बचाव कार्याचा प्रारंभ त्वरित करण्यात आल्याने वाचले अनेक जीव
ड विद्यार्थ्यांसमवेत अनेक शिक्षकही अडकले आहेत इमारत ढिगाऱ्यात
ड 20 वर्षांपूर्वी झाले होते या प्राथमिक शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण
ड दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश, उत्तरदायित्व निश्चितपणे निर्धारित होणार