जर्मनीतील कार हल्ल्यात 7 भारतीय जखमी
विदेश मंत्रालयाकडून हल्ल्याची निंदा : आरोपी सौदीचा डॉक्टर : 200 जणांना कारने चिरडले
वृत्तसंस्था/ मॅगडेबर्ग
जर्मनीच्या मॅगडेबर्ग शहरात ख्रिसमस मार्केटवर झालेल्या कार हल्ल्याची भारताने कठोर शब्दांत निंदा केली आहे. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात 7 भारतीय देखील जखमी झाले आहेत. भारतीय विदेश मंत्रालयाने यावर वक्तव्य जारी करत दु:ख व्यक्त केले आहे.
जर्मनीच्या मॅगडेबर्गमध्ये ख्रिसमस मार्केटवर झालेल्या या भयानक हल्ल्याची आम्ही कठोर निंदा करताहे. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला असून कित्येक जण जखमी झाले आहेत आमच्या संवेदना आणि प्रार्थना पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत असे भारतीय विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
जखमी झालेले भारतीय नागरिक आणि त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात भारतीय दूतावास आहे. त्यांना शक्य ती सर्व मदत उपलब्ध केली जात आहे. जखमी झालेल्या 7 भारतीय नागरिकांपैकी 3 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असल्याचे विदेश मंत्रालयाने सांगितले आहे.
सौदीच्या हल्लेखोराला अटक
ख्रिसमस मार्केटवर हल्ल्याप्रकरणी सौदी अरेबियाच्या एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा 2006 पासून जर्मनीतील सॅक्सोनी-अनहाल्ट येथे राहत होता. हल्लेखोराने एकट्यानेच हा हल्ला घडवून आणला आहे. हल्ल्यामागील त्याचा उद्देश स्पष्ट झाला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
जागतिक प्रतिक्रिया
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी या घटनेला निर्दोषांवरील क्रूर हल्ला संबोधिले आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी याला भयावह ठरवत जर्मनीला समर्थन देणार असल्याचे वक्तव्य केले. तर टेस्लाचे अध्यक्ष एलॉन मस्क यांनी जर्मन चॅन्सेलर ओलाफ शोल्ज यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मॅगडेबर्गमध्ये ख्रिसमस मार्केट
मॅगडेबर्ग हे शहर सॅक्सोनी-आन्हाल्ट प्रांताची राजधानी असून हे नदीच्या काठावर आहे. या शहराची लोकसंख्या सुमारे 2.40 लाख आहे. हे शहर बर्लिनपासून दीड तासांच्या ड्राइव्हच्या अंतरावर आहे. मॅगडेबर्गमध्ये दरवर्षी ख्रिसमस मार्केट आयोजित केले जाते आणि यात मोठ्या संख्येत लोक सहभागी होत असतात.
हल्लेखोराला शरणार्थीचा दर्जा
हल्लेखोराचे नाव तालेब असून तो मनोचिकित्सक आहे. तालेब 2006 पासून जर्मनीत वास्तव्यास आहे, त्याला 2016 मध्ये शरणार्थीचा दर्जा मिळाला होता. तो मॅगडेबर्ग शहरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावरील बर्नबर्ग येथे मेडिकल प्रॅक्टिस करत होता. त्याने हल्ला करण्यापूर्वी एक बीएमडब्ल्यू कार भाडेतत्वावर घेतली होती.