जुलैमध्ये 7 कोटी 54 लाख घरपट्टी वसूल
आजपासून दंडासह कर भरावा लागणार : आतापर्यंत 43 कोटी 78 लाख 37 हजार 277 रुपये वसूल
बेळगाव : घरपट्टी वसुली झाली तरच शहरामध्ये विविध विकासकामे राबविणे शक्य आहे. सरकारकडून येणाऱ्या निधीवर अवलंबून राहण्यापेक्षा घरपट्टी तसेच इतर कर वसूल केल्यास निश्चितच शहराचा कायापालट होऊ शकतो. यासाठी सरकारने 73 कोटीचे उद्दिष्ट बेळगाव महानगरपालिकेला दिले आहे. ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी कामाला लागले असून 7 कोटी 54 लाख 93 हजार 340 रुपये या महिन्यात करवसुली झाली आहे. सवलतीच्या दरामध्ये कर भरण्याचा हा शेवटचा महिना होता. गुरुवार दि. 1 ऑगस्टपासून आता दंडासह रक्कम भरावी लागणार आहे. महानगरपालिकेला करवसुली करण्यासाठी वारंवार जनजागृती करावी लागत आहे. जनजागृतीनंतरही काही जण कर भरण्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत आहेत. काही संस्था तसेच घरमालकांकडे बऱ्याच वर्षांची घरपट्टी बाकी आहे. अनेकवेळा नोटीस देऊनही संबंधितांनी घरपट्टी भरलीच नाही. त्यामुळे महानगरपालिकेला दरवर्षीच करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे अशक्य झाले आहे.
एप्रिल महिन्यापासून नवीन अर्थसंकल्पीय वर्षाला सुरुवात होत असते. यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये सवलतीच्या दरात करवसुली करण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र सर्व्हर डाऊन तसेच चलन वेळेत मिळाले नाही तर करवसुली करणे तसेच जनतेलाही कर भरताना त्रास सहन करावा लागला होता. सवलत वाढवावी अशी मागणी जनतेतून करण्यात आली होती. त्यानुसार महानगरपालिकेने तसेच विविध संघटनांनी पाठपुरावा केला. त्यानंतर सरकारने जून आणि जुलै महिन्यामध्येदेखील कर भरणाऱ्यांना सवलत दिली होती. त्याचा लाभ घेण्यात आला आहे. महानगरपालिकेने चार महिन्यांमध्ये तब्बल 43 कोटी 78 लाख 37 हजार 277 रुपये कर वसूल केला आहे. चार महिन्यांत उद्दिष्टामधील अर्ध्यापेक्षाही जास्त करवसुली करण्यात आली असून उर्वरित महिन्यांमध्ये शिल्लक असलेल्या करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची शक्यता आहे. एकूणच करवसुलीवर जास्तीतजास्त भर देण्यात आल्याचे दिसून आले आहे.