आसाममध्ये 7 कोटींच्नी प्रतिबंधित ड्रग्ज जप्त
तीन तस्करांना रंगेहाथ अटक
गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाममधील कार्बी आंगलाँग जिह्यात पोलिसांनी दोन ट्रकमधून 7 कोटी रुपयांची प्रतिबंधित औषधे-ड्रग्ज जप्त केली आहेत. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. आसाम-नागालँड सीमेवरील खटखटी भागात गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
काही गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परिसरात वाहन तपासणी केली असता एका ट्रकमधून 30,000 याबा गोळय़ा आणि दुसऱया ट्रकमधून 757.15 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. हे सर्व साहित्य 15 साबणाच्या बॉक्समध्ये भरून त्याची तस्करी करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या ड्रग्ज आणि हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 7 कोटी रुपये आहे. या कारवाईबद्दल आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट करून पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
गेल्या महिन्यात आसाम पोलिसांनी दोन वेगवेगळय़ा घटनांमध्ये कछार आणि कार्बी आंगलाँग जिह्यातून कोटय़वधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करत अमली पदार्थांची तस्करी करणाऱया पाच जणांना अटक केली होती. कछार जिह्यातील लखीपूर परिसरात नशेसाठी वापरल्या जाणाऱया 1 लाख 80 हजार गोळय़ांसह तिघांना अटक करण्यात आली होती. जप्त केलेल्या गोळय़ांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 50 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. अब्दुल सईद, इबाजुर रहमान आणि समीर आलम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते सर्व कछार जिह्यातील रहिवासी आहेत.