चीनच्या शिनजियांगमध्ये 7.2 तीव्रतेचा भूकंप
भूकंपोत्तर 40 झटके जाणवले : शेकडो घरे जमीनदोस्त : दिल्लीतही जाणवला प्रभाव
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीन-किर्गिस्तान सीमेवर सोमवारी रात्री 11.39 वाजता 7.2 तीव्रेतचा भूकंप झाला आहे. दक्षिण शिनजियांगमध्ये झालेल्या या भूकंपाचे केंद्र जमिनीत 22 किलोमीटर खोलवर होते. भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून कित्येक जण जखमी झाले आहेत. तर चीनच्या ग्लोबल टाइम्सनुसार भूकंपामुळे शेकडो घरे पूर्णपणे कोसळली आहेत. उइगूरबहुल भागांमध्ये या भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
भूकंपानंतर 40 धक्के नोंदविले गेले आहेत. भूकंपाचा सर्वाधिक प्रभाव उरुम्की, कोरला, काशगर, यिनिंगमध्ये दिसून आला. चीनच्या शिनजियांग प्रांतात रेल्वेसेवा रोखावी लागली आहे. यामुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना वाचविण्यासाठी 200 बचाव पथकांना रवाना करण्यात आले. चीनमध्ये झालेल्या भूकंपाचा प्रभाव भारतातही दिसून आला आहे. 1400 किलोमीटर अंतरावर दिल्ली-एनसीआरमध्ये दीर्घकाळापर्यंत लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे घाबरलेले लोक घरांमधून बाहेर पडले होते.
मंगळवारी सकाळीही जाणवले भूकंपाचे धक्के
चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्रानुसार मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 40 धक्के जाणवले आहेत. तर कजाकिस्तानात आपत्कालीन मंत्रालयाने 6.7 तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती दिली आहे. कजाकिस्तानातील सर्वात मोठे शहर अल्माटीमध्ये भूकंपाच्या भीतीमुळे लोकांनी घराबाहेर धाव घेतली आहे. आतापर्यंत या भूकंपामुळे कुठल्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त समोर आलेले नाही. उझ्बेकिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.