Satara News : कोरेगाव तालुक्यात ‘मनी लॉन्ड्रिंग’ची भीती दाखवून 68 वर्षीय शेतकऱ्यांकडून लाखोंची उकळ
खडखडवाडीत वृद्धाची १४.४० लाखांची फसवणूक
एकंबे : कोरेगाव तालुक्यातील खडखडवाडी येथील भानुदास नारायण बाबर (वय ६८) यांच्याकडून अज्ञातांनी पोलीस अधिकारी असल्याचे भासवून तब्बल १४ लाख ४० हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस ठाण्यातून शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार १७ ते २१ नोव्हेंबर दरम्यान फिर्यादीला व्हॉट्सअॅपवरून कॉल करून आरोपी आर. के. चौधरी आणि त्याच्या अनोळखी साथीदाराने पोलीस अधिकारी आहोत, तुम्ही मनी लॉड्रिंग प्रकरणात सामील असून तुमच्या नावावर गुन्हे दाखल असल्याची भीती दाखवली.
डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगून जामिनासाठी पैशाचे कारण देत वेळोवेळी आर.टी.जी.एस व चेकद्वारे १४ लाख ४० हजार रुपये घेत फिर्यादीची फसवणूक केली आहे.याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तपास करत आहेत.