इन्फोसिसला दुसऱ्या तिमाहीत 6506 कोटींचा नफा
पगार व नियुक्ती बाबतची नियमावली केली सादर : तिमाहीमध्ये निव्वळ नफा 4.7 टक्क्यांनी वाढला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इन्फोसिस या कंपनीने कमाईच्या बाबतीत 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आपल्या कमाईचा अंदाज हा 3.75 टक्क्यांवरून 4.5 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीने 3 ते 4 टक्के कमाईचा अंदाज जाहीर केला होता.बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील वाढता खर्च आणि दुसऱ्या तिमाहीतील संभाव्य व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या कमाईच्या अंदाजात सुधारणा केली आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनीने उत्पन्न अंदाजात केलेली ही दुसरी वाढ आहे.
इन्फोसिसने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एचसीएल टेक या दोन मोठ्या कंपन्यांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा 4.7 टक्क्यांनी वाढून 6,506 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात मागील तिमाहीच्या तुलनेत 2.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न वार्षिक तुलनेत 5.1 टक्के आणि तिमाहीआधारावर 4.2 टक्क्यांनी वाढून 40,986 कोटी रुपये झाले आहे.
ब्लूमबर्गच्या अंदाजांशी तुलना केल्यास, दुसऱ्या तिमाहीत इन्फोसिसची कामगिरी महसूल वाढीच्या बाबतीत चांगली होती, परंतु नफ्याच्या आघाडीवर अपेक्षेपेक्षा कमी आहे. ब्लूमबर्गने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत इन्फोसिसचे उत्पन्न 40,820.2 कोटी रुपये आणि नफा 6,831.4 कोटी रुपये राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. इन्फोसिसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख म्हणाले की, यूएसमध्ये बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील खर्च सातत्याने वाढत आहे. हे विशेषत: भांडवल, तारण आणि कर्ज आणि देयक श्रेणींमध्ये स्पष्ट आहे.
एआयवर असेल भर
वेतनवाढ जानेवारीत जाहीर केली जाईल आणि एप्रिलपासून लागू होईल, असेही कंपनीने म्हटले आहे. जनरल एआय बद्दल, कंपनीने सांगितले की कंपनी तीन विशिष्ट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनी एंटरप्राइझ-व्यापी जनरल एआय प्लॅटफॉर्म विकसित करत आहे. याशिवाय लहान भाषेचे मॉडेलही विकसित केले जात आहेत.