इस्लामपुरात गॅस एजन्सीत 64 लाखांचा अपहार! कॉम्प्युटर ऑपरेटरचा कारनामा
कॉम्प्युटर ऑपरेटरकडून कृत्य : सिलेंडर वितरणाचे पैसे स्वत: वापरले : फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल
इस्लामपूर प्रतिनिधी
येथील ओम गुरुदेव इंण्डेन गॅस वितरण एजन्सीचा कॉम्प्युटर ऑपरेटर सागर आनंदा तेवरे (38 रा.शिक्षक कॉलनी, टकलाईनगर, इस्लामपूर) याने गॅस वितरणाची 64 लाख 33 हजार 233 रुपयांच्या रक्कमेचा अपहार केल्याची घटना घडली. हा प्रकार दि. 1 एप्रिल 2021 ते दि.4 एप्रिल 2023 या दोन वर्षाच्या कालावधीत घडला.
तेवरे हा ओम गुरूदेव इंण्डेन गॅस वितरण एजन्सीत कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम पहात होता. या कंपनीचे डिलिव्हरी बॉय किरण नारायण कांबळे, महादेव नारायण कांबळे, दत्तात्रय नारायण कांबळे व सुनिल निवृत्ती लोखंडे यांनी ग्राहकांना सिलेंडर डिलिव्हरी दिल्यानंतर आलेले पैसे तेवरे याच्याकडे दिले. त्याने या रक्कमा ऑनलाईन ट्रॅन्झेक्शन करतो, असे सांगून स्विकारल्या. त्यामुळे चौघांनी त्याच्याकडे विश्वासाने या रक्कमा दिल्या.
संशयीत आरोपी तेवरे याने या रक्कमा स्वत:कडे ठेवून घेवून मोबाईलमधून कंपनीच्या अॅपवरती डिलिव्हरी कन्फर्म करुन नंतर त्या पावतीची डिलिव्हरी कम्पलिटेड/रिप्रिंट पेयेबल 00 अशा काढून ती डिलिव्हरी बॉय यांच्याकडे देवून सिलेंडरचे पैसे कंपनीकडे ऑनलाईन जमा केल्याचे भासवले. त्यातून त्याने गॅस एजन्सीची दिशाभूल करुन संगणक कामाची माहिती असल्याने त्याचा गैरफायदा घेवून त्या रोख रक्कमा स्वत:च्या फायद्यासाठी वापरुन अपहार केला. या प्रकरणी गॅस कंपनी एजन्सीचे व्यवस्थापक भरत अर्जुन जाधव यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.