हेस्कॉमच्या व्याप्तीत पाच वर्षांत विजेच्या धक्क्याने 631 जणांचा मृत्यू
जनजागृती गरजेची : दुर्लक्षच कारणीभूत असल्याची तक्रार
बेळगाव : बेळगावसह सात जिल्ह्यांना वीजपुरवठा करणाऱ्या हेस्कॉमने (हुबळी वीजपुरवठा महामंडळ) वीजपुरवठा व व्यवस्थापन चोखपणे करण्यात नाव मिळवले असल्याचे एकीकडे म्हणत असतानाच दुसरीकडे हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे गेल्या पाच वर्षांत विजेच्या धक्क्याने 631 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. लोकजागृतीचा अभाव व अक्षम्य दुर्लक्ष यामुळे माणूस असो की पशु विजेच्या धक्क्याने बळी जात असल्याचे सिद्ध झाले आहे. हेस्कॉमकडून बेळगावसह धारवाड, हावेरी, गदग, कारवार, बागलकोट व विजापूर या जिल्ह्यांना वीजपुरवठा होतो. राज्यात सर्वाधिक भागाला वीजपुरवठा करणारी संस्था म्हणून हेस्कॉमची ओळख आहे. वर नमूद केलेल्या सात जिल्ह्यांमध्ये मागील पाच वर्षांच्या काळात 631 नागरिक व ग्रामीण शहरी भागातील 732 पशु विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडले आहेत. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळेच असे प्रकार घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
अपघाताची कारणे
जमिनीवर तुटून पडलेल्या तारेचा स्पर्श झाल्याने, उच्च विद्युत वाहिनीला लोखंडी वस्तूचा स्पर्श झाल्याने, विद्युतभारित तारेला स्पर्श झाल्याने, विजेच्या उपकरणांचा बिनदिक्कतपणे उपयोग करणे, अनधिकृतपणे विजेची कामे करणे, मोठा पाऊस व वाऱ्यामुळे विजेचे खांब तुटून पडल्याने, शॉर्टसर्किटमुळे, विद्युत मार्गापासून सुरक्षित अंतर न ठेवता वहिवाट केल्याने यासारख्या कारणाने मृत्यू झाल्याच्या घटना अनेक आहेत.
भरपाई रक्कम अधिक असण्याची गरज
विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्यास शासनाकडून मिळणारी भरपाई ही भरीव असली पाहिजे. मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये, शरीराच्या काही भागात अपंगत्व आल्यास 1 ते 5 लाखापर्यंत भरपाई इंधन खात्याकडून देण्यात येते. भरपाई रकमेत वाढ झाली पाहिजे. हेस्कॉमतर्फे विविध जागृतीचे उपक्रम सुरू असतात. विजेच्या धोक्यापासून दूर कसे रहावे, याबद्दल माहिती देण्यात येत असते. तरीही विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याच्या घटना काही कमी झाल्या नाहीत. जुने विजेचे खांब, वीज वाहिन्या बदलून तेथे नवे साहित्य वापरले पाहिजे. विजेच्या धक्क्याने लाईनमन मृत्युमुखी पडण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे हेस्कॉमने अधिक जनजागृती करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे नागरिकांचे मत आहे.