तिसऱ्या टप्प्यात 62 टक्के मतदान
जम्मू-काश्मीरमधील मतदान प्रक्रिया पूर्ण, आता निर्णयाची प्रतीक्षा, 8 ऑक्टोबरला मनगणना
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मंगळवारी झालेल्या तिसऱ्या टप्प्यात किमान 62 टक्के लोकांनी मतदानाचा अधिकार उपयोगात आणला आहे. सर्वाधिक मतदान उधमपूर जिल्ह्यात झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची नेमकी आकडेवारी बुधवारी सकाळी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मतदानाच्या तीन्ही टप्प्यांमध्ये मिळून सरासरी 60 टक्के मतदान झाले असून ते गेल्या अनेक दशकांमधील सर्वाधिक आहे.
या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात 90 पैकी 40 मतदारसंघांमध्ये मतदान घेण्यात आले. उधमपूर जिल्ह्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 66 टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर बारामुल्ला जिल्ह्यात सर्वात कमी, म्हणजे 50 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्वच टप्प्यांमध्ये मतदान अतिशय शांततेने आणि उत्साहात पार पडल्याचे दिसून आले.
अनेक समाजांना प्रथम संधी
जम्मू-काश्मीर प्रदेशात अनेक समाज आजवर मतदानापासून वंचित राहिले होते. त्यांना या निवडणुकीत प्रथमच मतदानाची संधी मिळाली आहे. दलित असणारा वाल्मिकी समाज, तसेच गोरख समाज आणि पश्चिम पाकिस्तातून आलेले निर्वासित यांचा या समाजांमध्ये समावेश आहे. प्रथमच मतदानाची संधी लाभल्याने या समाजांच्या मतदारानी भरभरुन मतदान केल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्यात 90 जागा
जम्मू-काश्मीर विधानसभेत मतदारसंघांच्या परिसीमनानंतर 90 जागा आहेत. त्यांच्यापैकी 43 जागा जम्मू भागात, तर 47 जागा काश्मीर भागात आहेत. जम्मू भाग हा हिंदुबहुल, तर काश्मीर भाग हा मुस्लीम बहुल भाग आहे. जम्मू आणि उधमपूर भागांवर भारतीय जनता पक्षाचा अनेक दशकांपासून प्रभाव आहे. तर काश्मीर भागावर नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि पीपल्स डेमॉव्रेटिक पक्ष यांचा प्रभाव आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांचा काही प्रमाणात प्रभाव जम्मू भागातही आहे. पण भारतीय जनता पक्षाला काश्मीर भागात नाममात्र अस्तित्व आहे. यंदाची विधानसभा निवडणूक चुरशीची होईल असे अनुमान आहे.