For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर तालुक्यात आतापर्यंत 619 घरांची पडझड

10:43 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर तालुक्यात आतापर्यंत 619 घरांची पडझड
Advertisement

सरासरीपेक्षा अतिरिक्त पाऊस :  166 घरे पूर्ण कोसळली : 250 घरांना नुकसानभरपाई

Advertisement

खानापूर : खानापूर तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी 1969 मि. मी. इतकी आहे. आतापर्यंत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे यावर्षी पावसाने आपली सरासरी पूर्ण केली आहे. सध्या होत असलेला पाऊस हा अतिरिक्त असून आतापर्यंत सरासरीपेक्षा 25 टक्के पाऊस अतिरिक्त झालेला आहे. जून आणि जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने आपली वर्षाची सरासरी पूर्ण केली आहे. ऑगस्ट महिन्यात झालेला हा पाऊस अतिरिक्त असून अद्याप सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या तीन महिन्यात पाऊस होणार असल्याने सरासरीपेक्षा अतिरिक्त पाऊस होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

यावर्षी मे महिन्यापासूनच वळिवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांचा हंगाम योग्य वेळेत साधला होता. जून आणि जुलै महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली होती. ऑगस्ट महिन्यात काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र दहा-बारा दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे  पुन्हा नदी नाले तसेच विहिरी तलाव तुडुंब झाले आहेत. मागील वर्षी सरासरीपेक्षा 70 टक्के पाऊस कमी झाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता.  मात्र यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दमदारपणे सुरुवात करून आतापर्यंत सरासरी गाठलेली आहे.

Advertisement

पुढील तीन महिन्यात होणारा पाऊस हा अतिरिक्त पाऊस आहे. गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात 689 घरांची पडझड झाली असून यात 166 घरांची पूर्ण पडझड झालेली आहे. त्याच्यात 195 घरांचे अर्ज रद्दबादल करण्यात आले आहेत. तर आतापर्यंत 250 नुकसान धारकांना नुकसानभरपाई मिळालेली आहे. 34 अर्जांची अजून कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याने त्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. तालुक्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. अजूनही जोरदार पाऊस होत असल्याने घरे पडण्याचा धोका कायम आहे. गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना मात्र पोषक वातावरण मिळालेले आहे. तसेच यावर्षी होत असलेल्या पावसामुळे गुरांना चाराही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला असल्याने दूध उत्पादनही मोठ्या प्रमाणात  होत आहे. तसेच पुढील तीन महिने हिरवा चारा उपलब्ध होणार असल्याने यावेळी दूध उत्पादनही वाढणार असल्याचे शेतकऱ्यांतून सांगण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.