For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अधिवेशन बंदोबस्तासाठी 6 हजार पोलिसांची फौज

12:36 PM Nov 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
अधिवेशन बंदोबस्तासाठी  6 हजार पोलिसांची फौज
Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisement

9 डिसेंबरपासून बेळगाव येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्ताच्या तयारीचा शुक्रवारी कायदा व सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक हितेंद्र आर. यांनी आढावा घेतला. बंदोबस्तासाठी आठ जिल्ह्यातील सहा हजार पोलीस तैनात करण्यात येणार असल्याचे हितेंद्र यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त कार्यालयातील सभागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार विकाश, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त रोहन जगदीश यांच्यासह बेळगाव येथील एसीपी, पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

दि. 9 ते 19 डिसेंबरपर्यंत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात अनेक आंदोलने होतात. महनीय व अतिमहनीय व्यक्तींचे दौरे असतात. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्याबरोबरच शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची जबाबदारीही पोलीस दलावर आहे. याचा आढावा घेण्यासाठी आपण बेळगावला आल्याचे हितेंद्र आर. यांनी सांगितले.

बंदोबस्तासाठी सहा हजार पोलिसांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांच्या निवासासाठी तंबू उभारण्यात येत आहेत. जेवणखाण व्यवस्था करण्यात येत आहे. यंदा बेळगावात थंडी अधिक आहे. त्यामुळे बंदोबस्तासाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ऊबदार कपडे सोबत घेऊन येण्याची सूचना करण्यात आली आहे. जर त्यांनी आणले नाही तर ते आम्हीच पुरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महामेळाव्याला परवानगी नाही

कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महामेळावा घेतला जातो. बेळगावात अधिवेशन सुरू झाल्यापासून ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही महामेळाव्याला परवानगी देणार नाही, असे हितेंद्र आर. यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.