स्वीत्झर्लंडमध्ये सापडले 600 वर्षे जुने लोखंडी ग्लोव्ह्ज
पुरातत्व तज्ञांनी स्वीत्झर्लंडमध्ये लोखंडी ग्लोव्हज शोधले आहेत. हे ग्लोव्ह्ज 14 व्या शतकातील आहेत. त्या काळातील योद्धे म्हणजेच नाइट्स यांच्याकडून या लोखंडी ग्लोव्ह्जचा वापर केला जात होता. झ्यूरिचपासून 18 किलोमीटर अंतरावरील कीबर्ग कॅसलनजीक एक मध्यकालीन वस्ती आढळून आली आहे. येथेच एका वाइनच्या गोदामात हे लोखंडी ग्लोव्ह्ज मिळाले आहेत. या ग्लोव्हजच्या चारही लोखंडी बोटांना वाकविता येते, प्रत्येक सांध्यावर वेगळी लोखंडी प्लेट आहे. या ग्लोव्हजना पाहिल्यावर ते माशाच्या शरीरारातील सांगाड्याप्रमाणे दिसून येते. त्यांना पातळ धातूच्या आवरणाने जोडण्यात आले आहे. आतील बाजूला चामड्याचे आणि कापड्याचे आच्छादन आहे. या ग्लोव्हजवर होणाऱ्या धारदार अस्त्राच्या हल्ल्यानंतरही हात सुरक्षित राहत होता. या ग्लोव्हजच्या भोवताली अनेक आणखी धातूंच्या कलाकृती, अवजारं मिळाली आहेत. हातोडा, जीभ, ट्वीजर्स, चाकू, प्लायर, चाव्या आणि डाव्या हाताच्या लोखंडी ग्लोव्हजचे तुकडे प्राप्त झाले आहेत. या ऐतिहासिक वस्तू मिळणे भाग्याची गोष्ट आहे. परंतु या ठिकाणी एक नवे निर्मितीकार्य होणार असल्याचे पुरातत्व तज्ञांकडून सांगण्यात आले.
येथे निर्मितीकार्य झाल्यास प्राचीन सामग्री शोधता येणार नाही. निर्मितीकार्यापूर्वी त्यांचा शोध घ्यावा लागणार असल्याचे येथे उत्खनन करणाऱ्या पथकाच्या प्रमुख लोरेना बर्काहार्ट यांनी सांगितले आहे. लोरेना झ्यूरिच विद्यापीठात पुरातत्वशास्त्राच्या ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत. स्वीत्झर्लंडमध्ये पूर्णपणे सुरक्षित लोखंडी ग्लोव्हज मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी मिळालेले सर्वात प्राचीन ग्लोव्हज हे 15 व्या शतकातील होते. स्वीत्झर्लंडमध्ये आतापर्यंत 5 ग्लोव्हज मिळाले आहेत, परंतु ते सर्व 15 वे शतक किंवा त्यानंतरच्या कालखंडातील आहेत. तसेच यातील कुठलाही ग्लोव्हज पूर्णपणे सुरक्षित नव्हता. कीबर्ग कॅसलनजीक आतापर्यंतचा सर्वात प्राचीन लोखंडी ग्लोव्हज मिळाला आहे. याचे डिझाइन आणि धातूची गुणवत्ता अद्याप सुरक्षित असल्याचे पुरातत्व तज्ञांनी सांगितले आहे. 29 मार्चपासून ग्लोव्हज कीबर्ग कॅसलमध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत.