पोलिसांना केले 60 हजार कॉल
विमानात किंवा विमानतळांवर बाँब पेरलेले आहेत, असे फोन कॉल करुन घाबरविण्याचे विकृतपणा काहीजण करतात, हे सर्वपरिचित आहेत. मध्यंतरीच्या काळात भारताही असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. असा फोन आला, की विमान कंपनीला प्रवासात असलेली विमाने माघारी बोलवावी लागतात आणि त्यांना कोणताही धोका पत्करायचा नसतो. दुसऱ्याला त्रास देऊन त्याची कोंडी करण्यात असा प्रकारे काही जणांना असुरी आनंद मिळतो. किंवा हा कोणत्यातरी गंभीर कटकारस्थानाचा भाग असू शकतो. एकाद्या देशातील व्यवस्था विस्कळीत करणे आणि त्या देशाला प्रगती करण्यापासून रोखणे असे उद्देश असू शकतात. त्यामुळे असे करणाऱ्या व्यक्ती पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्यांची खोलता शिरुन चौकशी केली जाते. दक्षिण कोरिया या देशात एका व्यक्तीकडून हे घडले आहे.
या व्यक्तींने अवघ्या दोन वर्षांपेक्षाही कमी काळात पोलिसांना 60 हजार फोन करुन गुन्हा घडल्याची खोटी वृत्ते दिली आहेत. अखेरीस त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी त्याला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा केली जाऊ शकते. मात्र, त्याने असे का केले याची कसून चौकशी केली जात आहे. हा मानसिक रुग्णत्वाचा भाग आहे, की कोणत्या मोठ्या कारस्थाची नांदी आहे, हे तेथील पोलिसांकडून तपासले जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या व्यक्तीचे नाव प्रकट करण्यात आलेले नाही. या व्यक्तीचे वय आज 70 वर्षांचे आहे. गेल्या वर्षी त्याने अवघ्या चार दिवसांमध्ये पोलिसांना 1 हजार 882 कॉल करुन गुन्हे घडल्याची खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यक्तीची मानसिक तपासणीही करण्यात येत आहे. पोलिसांची दिशाभूल करणे हा प्रत्येक देशात गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे तो सिद्ध झाल्यानंतर या व्यक्तीला कठोर शिक्षा होणार हे निश्चित मानले जात आहे.