डोळ्यातून निघाले 60 जिवंत किडे
चीनमध्ये एक अजब शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली आहे. एक महिला तिच्या डोळ्यांतून सारखे पाणी येत होते आणि एक डोळा दुखतही होता, म्हणून डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली तेव्हा फारसा दोष आढळला नाही. पण महिलेचा त्रास कमी होत नव्हता. म्हणून सखोल तपासणी केली असता डॉक्टरांनाही धक्का बसेल अशी वस्तुस्थिती असल्याचे त्यांना दिसून आले.
या महिलेच्या डोळ्यांच्या कडांमध्ये आतल्या बाजूला चक्क जिवंत किडे दिसून आले. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेणे भाग होते. त्याप्रमाणे शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हा या महिलेच्या डोळ्यातून एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 60 जिवंत, आळ्यांसारखे दिसणारे किडे बाहेर आले. ही शस्त्रक्रिया करणे अवघड होते. पण अनेक तासांच्या परिश्रमानंतर ती पूर्ण झाली. विशेष म्हणजे, हे सर्व किडे बाहेर काढण्यात आले, तेव्हा जिवंत होते. तसेच या महिलेला डोळा दुखणे आणि त्यातून पाणी येणे यापलिकडे फारसा त्रास झालेला नव्हता. तसेच तिच्या दृष्टीतही काही दोष निर्माण झाला नव्हता. डॉक्टरांनीही अशी शस्त्रक्रिया प्रथम केली होती. त्यामुळे ती अतिशय जपून करावी लागली होती.
ही शस्त्रक्रिया यशस्वी करणारे डॉ. गुआन यांनी या शस्त्रक्रियेसंबंधी माहिती देताना ती अतिशय किचकट होती असे स्पष्ट केले. तसेच असा प्रकार अतिशय दुर्मिळ असतो. कानांमध्ये जिवंत किडे सापडणे हे नवे नाही. कारण कानांच्या आतल्या भागात असे किडे जिवंत राहण्यासाठी जागा असते. पण डोळ्यात अशी जागा नसते. तसेच डोळ्यात हे किडे निर्माण कसे झाले आणि काढेपर्यंत जिवंत कसे राहिले, यावर आता संशोधन केले जात आहे. डोळ्यांमध्ये औषध घालूनही ते मेले नाहीत, हे ही विशेष मानले जात आहे. त्यामुळे या किड्यांवरही प्रयोगशाळेत संशोधन केले जात आहे. तिच्या डोळ्यांमध्ये कुत्रे किंवा मांजरांपासून या किड्यांचे संक्रमण झाले असावे, अशी शक्यता अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे.