60 टक्के मतांसह युतीला 28 जागा द्या!
केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आवाहन : बेंगळुरात भाजप कार्यकर्त्यांची सभा
प्रतिनिधी/ बेंगळूर
लोकसभा निवडणुकीत राज्यात 60 टक्के मतांसह सर्व 28 मतदारसंघांमध्ये भाजप-निजद युतीचे उमेदवार निवडून आणा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी केले. याचवेळी राज्य काँग्रेस सरकारवर निशाणा साधताना त्यांनी विकासकामे राबविण्यात कर्नाटकातील काँग्रेस अपयशी ठरले आहे. एकीकडे खुर्ची वाचविण्यासाठी संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे खुर्ची मिळविण्यासाठी संघर्ष सुरू आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.
बेंगळूरमधील राजवाड मैदानावर भाजप कार्यकर्त्यांच्या सभेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश, त्यांच्या कामांची माहिती, काँग्रेसचा भ्रष्टाचार व इतर माहिती घरोघरी पोहोचवावी. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 43 टक्के मतांसह 17 मतदारसंघात तर 2019 मध्ये 51 टक्के मतांसह 25 मतदारसंघांत भाजपचे उमेदवार निवडून आले होते. यावेळी 60 टक्के मतांसह 28 पैकी 28 जागांवर भाजप-निजद युतीचे उमेदवार निवडून आणा, असे आवाहन त्यांनी केले.
12 लाख कोटींचा घोटाळा करणारे इंडिया आघाडीत
कर्नाटकातील जनता भ्रष्टाचाऱ्यांना जवळ करणार नाही. कॉमनवेल्थ गेम, 2 जी स्पेक्ट्रम, ऑगस्टा हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा अशा अनेक गैरव्यवहारांसह 12 लाख कोटींचा भ्रष्टाचार करणारे ‘इंडिया’ आघाडीत आहेत. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री असताना किंवा पंतप्रधान असताना एका पैशाचाही भ्रष्टाचार केलेला नाही. मोदींसमवेत आपण चार दशकांपासून काम करत आहे. दोन दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी मुख्यमंत्री-पंतप्रधान म्हणून काम केले आहे. एक दिवसही त्यांनी सुटी घेतलेली नाही. मात्र, राहुल गांधी उन्हाळा सुरु होताच विदेशात जातात, अशी टीका अमित शहा यांना केली.
राममंदिर प्रकरणात काँग्रेसकडून विलंब
मोदींनी गरीब, वंचित, महिला आणि तरुणांसाठी विविध लोकप्रिय योजना राबविल्या आहेत. 12 कोटी शौचालये बांधण्यात आली आहेत. 4 कोटी घरे बांधली आहेत. 10 कोटी गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. 5 लाखांचा आरोग्य विमा देण्यात आला आहे. कलम 370 रद्द करण्यात आले आहे. 500 वर्षे तंबूत असलेल्या रामलल्लांसाठी भव्य राममंदिर बांधले आहे. काँग्रेसने राममंदिर प्रकरणात सातत्याने विलंब केला. तुष्टीकरण व व्होट बँकेचे राजकारण करणारे काँग्रेस नेते अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनालाही उपस्थित राहिले नाहीत. पाकिस्तान आणि इतर देशांतून निर्वासित म्हणून आलेल्या हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि इतरांना येथे नागरिकत्व देण्यात आले आहेत, असे समर्थन अमित शहा यांनी केले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात आम्ही निवडणूक आखाड्यात आहे. दुसरीकडे कुटुंबवाद, भ्रष्टाचारात बुडालेली इंडिया आघाडी रिंगणात आहे. त्यामुळे मतदारांनी निवडणुकीत योग्य निर्णय घ्यावा. मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारने सर्जिकल स्ट्राईक, नवे संसद भवन, फौजदारी गुन्ह्यात बदल, देशाला जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनविले आहे, अशी माहितीही त्यांनी याप्रसंगी दिली.
विकासकामांकडे काँग्रेस सरकारचे दुर्लक्ष
कर्नाटकाच्या विकासाकडे काँग्रेस सरकारचे लक्ष नाही. एकीकडे खुर्ची वाचविण्यासाठी संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे खुर्ची हिसकावण्यासाठी संघर्ष सुरू आहे. केंद्रात संपुआची सत्ता असताना 10 वर्षात कर्नाटकाला 1,42,000 कोटी रुपये अनुदान दिले होते. आम्ही 10 वर्षात 4,91,000 कोटी रुपये दिले आहेत, असे समर्थन करत अमित शहा यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा चिमटा काढला.
सभेप्रसंगी राज्य भाजप प्रभारी राधामोहनदास अगरवाल, सहप्रभारी सुधाकर रे•ाr, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा, सदानंदगौडा, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे राज्य संघटना सचिव राजेश जी. व्ही. व इतर नेते उपस्थित होते.
बंडखोरी शमवण्यासाठी कसरत
उमेदवारांच्या घोषणेनंतर राज्य भाजपमध्ये निर्माण झालेले मतभेद आणि बंडखोरी शमविण्याचा करण्याचा प्रयत्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. मंगळवारी त्यांनी पक्षातील नाराज नेत्यांशी चर्चा करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. राज्यात निवडणूक प्रचारासाठी आलेल्या अमित शहा यांनी सकाळी एका खासगी हॉटेलमध्ये नाराज नेत्यांशी चर्चा केली. तिकीट न मिळाल्याने नाराजी व्यक्त केलेल्या माजी मुख्यमंत्री सदानंदगौडा यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
सदानंदगौडा यांच्या भेटीनंतर शहा यांनी माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याशीही चर्चा केली. गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंडखोर नेत्यांशी चर्चा करून बंडाळी शमविण्यासाठी राजी केल्याची माहिती येडियुराप्पा यांनी अमित शहांना दिली. तिकीट गमावलेले कोप्पळचे खासदार करडी संगन्ना, माजी मंत्री रेणुकाचार्य, चित्रदुर्गचे आमदार चंद्रप्पा यांचे पुत्र रघू चंदन यांचीही माहिती येडियुराप्पांनी दिली.
ईश्वरप्पांना बोलावले दिल्लीला...
लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलाला तिकीट न मिळाल्याने भाजप नेत्यांविरोधात बंडाचे निशाण हाती घेणारे माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत येण्याची सूचना केली आहे. शिमोग्यातून बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ईश्वरप्पा यांनी केली होती. त्यामुळे अमित शहा यांनी ईश्वरप्पांना फोन करून दिल्लीला येण्यास सांगितले आहे. ईश्वरप्पा यांनी त्यांच्या समर्थक आणि निकटवर्तीयांना याविषयी माहिती दिली असून ते बुधवारी दिल्लीला रवाना होणार आहेत. मात्र, आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे ईश्वरप्पांनी म्हटले आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदावरील नेता बदला. तेव्हाच अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याच्या निर्णयातून माघार घेईल, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.