सराफ व्यावसायीक लुट प्रकरणी 6 जण जेरबंद; 24 लाखांची रोकड, चारचाकी, दुचाकी 5 मोबाईल जप्त
जुना राजवाडा पोलिसांची कारवाई
कोल्हापूर प्रतिनिधी
सराफ व्यावसायीकाचा पाठलाग करुन 28 लाखांची रोकड लुटणाऱ्या सहा जणांना जुना राजवाडा पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून लुटीची 24 लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. तसेच चोरट्यांकडून 5 मोबाईल, दुचाकी असा सुमारे 28 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबतची फिर्याद दादा नामदेव मेटकरी (रा. चंबुखडी, कोल्हापूर) यांनी 14 फेब्रुवारी रोजी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली होती.
या प्रकरणी पोलिसांनी रोहित नारायण केसरकर (वय 28 रा. बोंद्रे गल्ली, शिवाजी पेठ), रणजीत मधुकर कोतेकर (वय 35 रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर , फुलेवाडी रिंग रोड ,कोल्हापूर), स्वप्निल सुकलाल ढाकरे (वय 26 रा. राजेंद्र नगर, झोपडपट्टी), सौरभ लक्षमण शिवशरण (वय 24 रा. राजेंद्र नगर झोपडपट्टी ), तुषार जयसिंग रसाळे (वय 28 रा.तस्ते गल्ली, मंगळवार पेठ), ओमकार विजय शिंदे (वय 29 रा. ए वार्ड काळकाई गल्ली, शिवाजी पेठ) या सहा जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 27 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दादा नामदेव मेटकरी जिह्यातील सराफ व्यवसायिकांना होलसेल दागिने पुरविण्याचे काम करतात. 14 फेब्रुवारी, 2024 रोजी कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांकडून पैशाची वसुली करून आपल्या मित्रासह दुचाकीवरुन चंबुखडी येथे घरी निघाले होते. यावेळी देवकर पानंद परिसरात एका पेट्रोल पंपावर दबा धरून बसलेल्या चार ते पाच जणांनी त्यांच्या मोटरसायकलचा पाठलाग करून त्यांना रस्त्यात खाली पाडले. त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम 28 लाख रुपयांची बॅग हिसडा मारुन लंपास केली.
जुना राजवाडा पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत गतीमान तपास केला.फिर्यादी दादा मेटकरी ज्या मार्गावरून आले त्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये तुषार रसाळे हा तरुण दादा मेटकरी यांचा पाठला करत असल्याचे दिसून आले, यामुळे पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी तुषार रसाळे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली, यावेळी त्यांने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी सराईत गुन्हेगार रोहित केसरकर, रणजीत कोतेकर यांच्यासह अन्य चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्यांनी सराफ व्यवसायिकास लुटल्याचे कबूल केले.
पोलिसांनी सर्व संशयितान अटक करून त्यांच्याकडून 24 लाखाची रोकड गुह्यात वापरलेली मोटरसायकल तसेच गुह्यातील पैशातून घेतलेली कार असा मुदेमाल जप केला आहे.
या गुह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस हवालदार परशुराम गुजरे, सतीश भांबरे ,अमर पाटील, प्रशांत पांडव, गजानन गुरव, संदीप माने, योगेश गोसावी, गौरव शिंदे, उत्तम गुजरे यांनी केला.
500 हून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज
लुटीच्या दिवशी मेटकरी हे ज्या ज्या ठिकाणी गेले, ज्या ठिकाणाहून त्यांनी पैसे गोळा केले. त्या त्या ठिकाणीचे सीसीटीव्ही फुटेज पोलीसांनी ताब्यात घेतले. यामध्ये तुषास रसाळे हा प्रत्येक ठिकाणी आढळल्याने पेलीसांचा संशय बळावला,आणि त्याला जेरबंद करण्यात आले.
नेमकी रक्कम अद्यापही गुलदस्त्यात
लुटीतील नेमक्या रकमेचा आकडा अद्यापही गुलदस्त्यात आहे. लुटीची घटना घडल्यानंतर 1 कोटी रुपयांची रक्कम नेल्याची चर्चा जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये होती. लुटीची घटना 14 तारखेला घडूनही फिर्याद देण्यास तब्बल तीन दिवसांचा कालावधी लागला. हा तीन दिवसांचा कालावधी लागण्यामागचे नेमके गौडबंगाल काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
कारागृहात ओळख, प्रत्यक्षात लुट
रोहीत केसरकर याचे बॅचलर ऑफ कम्प्युटर अॅप्लीकेशनचे शिक्षण झाले आहे. रोहीत व रणजित हे मित्र असून ते खूनाच्या प्रयत्नाच्या गुह्यात कारागृहात होते. या ठिकाणी या दोघांची ओळख स्वप्नील ढाकरे सोबत झाली. या कटामध्ये तुषारने रेकी करण्याचे काम केले, तर ओंकारने लुट कशा पद्धतीने करायची त्यानंतर कोठून गायब व्हायचे याचा प्लॅन आखला.