For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नऊ महिन्यांत 6 माता, 43 बालमृत्यू

11:30 AM Jan 18, 2025 IST | Radhika Patil
नऊ महिन्यांत 6 माता  43 बालमृत्यू
Advertisement

कोल्हापूर / कृष्णात चौगले : 

Advertisement

जिह्यात एप्रिल 2024 ते डिसेंबर 2024 या नऊ महिन्यांच्या कालावधीत 7 माता मृत्यू आणि 43 बालमृत्यू झाले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत माता व बालमृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या ‘आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी’ अशा स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे उपाययोजना कागदावरच राहिल्या असून माता-बालमृत्यूचे सत्र सुरुच आहे. दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बाळंतपण करणाऱ्या कुशल कर्मचाऱ्यांचा अभाव, प्रसुतीदरम्यान ऐनवेळी जोखीम निर्माण झाल्यास संबंधित मातेस जिल्हा रूग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी होत असलेली दिरंगाई, रक्तक्षय (अॅनेमिया) हे अनेक मातांच्या मृत्यूचे कारण बनले आहे.

कोणत्याही महिलेचा गरोदरपणात अथवा बाळंतपणानंतर 42 दिवसांच्या आत गरोदरपणाशी निगडीत कोणत्याही कारणाने किंवा गरोदरपणात वाढलेल्या गुंतागुंतीमुळे होणारे मृत्यू हे माता मृत्यू म्हणून ओळखले जातात. तर 0 ते 5 वर्षांपर्यंतचे बालक दगावल्यास त्याला बालमृत्यू असे संबोधले जाते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी कोल्हापूर जिह्यातील माता, बालमृत्यूचे गेल्या 9 महिन्यांतील प्रमाण पाहता ते जास्त आहे. सीईओ कार्तिकेयन एस यांनी माता-बालमृत्यू अन्वेषण समितीची गेल्या आठवड्यात सभा घेऊन माता, बालमृत्यू रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. यामध्ये अंगवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी व आरोग्य कर्मचारी विशेष लक्ष द्यावे असे निर्देशही त्यांनी दिले होते. पण हे माता व बालमृत्यूचे कारण शोधण्यासाठी सीईओंनी थेट संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपपेंद्रांना भेटी दिल्यास तेथील उणीवा, दोष आणि प्रशासनाकडून कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा अचूक अंदाज येईल.

Advertisement

  • गडहिंग्लजमध्ये सर्वाधिक 8 बालमृत्यू

जिह्यात एप्रिल ते डिसेंबर 2024 अखेर 43 बालमृत्यू झाले आहेत. यामध्ये गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक आठ संख्या आहे. तर आजरा 1, भुदरगड 5, चंदगड 1, गगनबावडा 0, हातकणगंले 2, कागल 2, करवीर 4, पन्हाळा 7, राधानगरी 3, शाहुवाडी 4, तर शिरोळ तालुक्यात 6 बालमृत्यू आहेत. यामध्ये 28 दिवसापर्यंतची 15 , 29 दिवस ते 1 वर्षापर्यंतची 13, 1 ते 5 वर्षापर्यंतच्या 15 बालकांचा मृत्यू झाला आहे.

  • माता बालसंगोपन अधिकाऱ्यांच्या कागलमध्ये सर्वाधिक 3 माता मृत्यू

एप्रिल ते डिसेंबर 2024 पर्यंत जिह्यात एकूण 6 माता मृत्यू झाले आहेत. यामध्ये कागल तालुक्यात सर्वाधिक 3, तर जानेवारी 2025 या महिन्यातही 1 मातामृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे जिह्याचे माता बालसंगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई यांच्याकडेच कागल तालुक्याचे आरोग्य अधिकारी म्हणून कार्यभार आहे. हे दोन्ही कार्यभार देसाई यांच्याकडे असताना देखील या तालुक्यात सर्वाधिक माता मृत्यू झाले आहेत. तसेच जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी पदाचा कार्यभार देसाई यांच्याकडे असताना त्यांच्याकडे पुन्हा कागल तालुक्याचा कार्यभार का दिला ? हा संशोधनाचा विषय आहे. तर गडहिंग्लजमध्ये 1, हातकणंगले 1 आणि राधानगरी तालुक्यात 1 मातामृत्यू झाला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात जिह्यातील ही संख्या केवळ 1 इतकी होती.

  • माता, बालमृत्यू रोखण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी

मातामृत्यू रोखण्यासाठी शासनाकडून वास्तल्य योजना, जननी सुरक्षा, जननी शिशु सुरक्षा, प्रधनमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, प्रधानमंत्री मातृत्व योजना, किलकारी कार्यक्रम, माता मृत्यू अन्वेषण आदी योजना राबविल्या जात आहेत. तर बालमृत्यू रोखण्यासाठी नियमित लसीकरण कार्यक्रम, अतिसार नियंत्रण पंधरवडा, सांस (AAऱ्ए) कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, जंतनाशक मोहिम, बालमृत्यू अन्वेषण, शिशु पोषण माह आदी योजनांच्या माध्यमातून बालमृत्यू रोखण्याचा प्रयत्न सुरु आहे. या योजना प्रभावीपणे राबविण्याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

                                                             अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि..कोल्हापूर

Advertisement
Tags :

.