युक्रेन युद्धात 6 लाख रशियन सैनिक ठार?
‘कीव इंडिपेंडंट’चा दावा : आठ हजार रणगाडे उद्ध्वस्त
वृत्तसंस्था/ कीव
रशिया-युक्रेन युद्धात 6 लाखांहून अधिक रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनियन वेबसाईट कीव इंडिपेंडंटने केला आहे. 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनवर झालेल्या हल्ल्यापासून आतापर्यंत 6 लाख 03 हजार 010 रशियन सैनिकांनी आपला जीव गमावल्याची माहिती युक्रेनियन आर्मीच्या जनरल स्टाफच्या हवाल्याने देण्यात आली आहे.
गेल्या अडीच वर्षांत युक्रेनने 8,522 रशियन रणगाडे, 16,542 चिलखती वाहने, 17,216 तोफखाने, 1,166 रॉकेट यंत्रणा, 928 हवाई संरक्षण यंत्रणा, 367 विमाने, 328 हेलिकॉप्टर्स, 13,902 ड्रोन्स, 28 जहाज आणि 1 पाणबुडी नष्ट केल्याचे कीव इंडिपेंडंटच्या अहवालात म्हटले आहे. त्याचवेळी, रशियन लष्कराने मंगळवारी 2,000 हून अधिक युक्रेन सैनिक मारल्याचा दावा सोशल मीडियावर केला आहे. मात्र, या आकडेवारीबाबत संदिग्धता व्यक्त केली जात आहे.
युक्रेनियन सैन्याने 1,250 चौरस किमी रशियन प्रदेश ताब्यात घेतल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. युक्रेनचे सैन्य रशियाच्या 35 किमी आत घुसले आहे. युक्रेनने अचानक केलेल्या हल्ल्यानंतर 2 लाखांहून अधिक रशियन नागरिकांना घर सोडून पळ काढावा लागला, असे युक्रेनचे लष्करप्रमुख अलेक्झांडर सिरस्की यांनी सांगितले.