एकाच कुटुंबातील 6 जण जलाशयात बुडाले
बेंगळूर : तुमकूर जिल्ह्याच्या कुणिगल तालुक्यातील मार्कोनहळ्ळी जलाशयात बुडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला तर एकजण बचावला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. दोघांचे मृतदेह हाती लागले असून उर्वरितांच्या मृतदेहाचा शोध जारी आहे. तुमकूर शहरातील बी. जी. पाळ्या येथील साजिया, अरबीन शबाना, ताबस्सुम, महिब व मिफ्रा अशी मृतांची नावे आहेत. तर नवाज याला वाचविण्यात स्थानिकांना यश आले. त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी हुलियुरदुर्ग पोलीस आणि अमृतुर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. तुमकूरमधील एकाच कुटुंबातील 7 जण कुणिगल तालुक्यातील मागडीपाळ्या येथील नातेवाईकांच्या घरी आले होते. दुपारी भोजनानंतर ते मार्कोनहळ्ळी जलाशय परिसरात आले होते. जलाशयाच्या पाण्यात उतरताच ते बुडाले. यापैकी नवाजला वाचविण्यात यश आले. मात्र, सहाजणांचा बुडून मृत्यू झाला. सायंकाळपर्यंत साजिया व अरबीन यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. तबस्सुम (वय 45), शबाना (वय 44), मिफ्रा (वय 4) आणि माहिब (वय 1) यांचे मृतदेह अद्याप हाती लागले नाहीत.