पाकिस्तानमध्ये कार स्फोटात 6 ठार
किमान 30 जण जखमी, दहशतवाद्यांचा हल्ला
वृत्तसंस्था / इस्लामाबाद (पाकिस्तान)
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील एका न्यायालयाच्या नजीक झालेल्या कारबाँब स्फोटात किमान 6 जणांचा बळी गेला आहे. हा दहशतवादी हल्लाच असल्याचे इस्लामाबादच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या ह्ल्ल्यात किमान 30 जण जखमी असून त्यांच्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. चौकशीचा आदेश दिला गेला आहे.
मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या आसपास न्यायालयाच्या परिसरात थांबविण्यात आलेल्या एका कारमध्ये लपविण्यात आलेल्या बाँबचा स्फोट झाला. यामुळे कारचे तुकडे तुकडे झाले. तसेच आजूबाजूच्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली. यावेळी न्यायालय परिसरात मोठी गर्दी होती. या स्फोटात गर्दीतील काही वकीलांनीही प्राण गमावले असून अनेक वकील जखमी झाले आहेत.

सहा किलोमीटरपर्यंत आवाज
हा स्फोट इतका मोठा होता की, त्याचा आवाज 6 किलोमीटरपर्यंत ऐकू आला, अशी माहिती देण्यात आली आहे. या स्फोटामुळे न्यायालय परिसरात एकच घबराट उडाली होती. अनेकांनी परिसरातून पळ काढून सुरक्षित स्थळी जाण्याची धडपड केली. यापूर्वीच काही तास वझीरीस्तानच्या भागात पोलीसांनी तेहरिक ए इन्साफ पाकिस्तान या संघटनेची हल्ल्याची योजना उध्वस्त करण्यात यश मिळविले होते, असा दावा करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर काही वेळातच न्यायालयाच्या परिसरात हा स्फोट झाला. तो याच संघटनेने घडवून आणला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. इस्लामाबाद प्रशासनाने हा दहशतवादी हल्लाच आहे, असे स्पष्ट केले असून चौकशीला प्रारंभ केला आहे.
इस्लामाबादमध्ये सावधानेचा इशारा
या स्फोटाच्या घटनेनंतर इस्लामाबादमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला असून शहरात महत्वाच्या स्थानांवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कराची आणि लाहोर या महत्वाच्या शहरांच्या प्रशासनांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला. इस्लामाबाद येथील हल्ल्याची चौकशी करण्यात येत असून आतापर्यंत काही स्थानी धाडी घालण्यात आल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
भारतातील स्फोटानंतर लगेचच...
भारतची राजधानी दिल्ली येथील एका मेट्रो स्थानकानजीक सोमवारी मोठा कार स्फोट झाला होता. त्यानंतर 18 तासांच्या आत पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येही कारस्फोट झाला आहे. भारतातील हा स्फोटही जैश ए मोहम्मद या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेचे रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केल्यानंतर काही तासांमध्ये करण्यात आला होता. भारतातील हे रॅकेट उध्वस्त करताना पोलिसांनी 3 हजार किलो स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला होता. त्यानंतर एका दिवसात दिल्लीत आत्मघाती कारस्फोट करण्यात आला.