शियन सैन्यात सामील 6 गोरखा सैनिवरांचा मृत्यू
अग्निवीर योजनेपासून दूर राहणे पडले महागात
वृत्तसंस्था/ काठमांडू
भारतीय सैन्याच्या अग्निवीर योजनेपासून दूर राहणारे नेपाळचे गोरखा आता मोठ्या संख्येत रशियन सैन्यात सामील होत आहेत. युक्रेनविरोधात युद्ध लढताना आतापर्यंत नेपाळचे रहिवासी असलेले 6 गोरखा सैनिक मारले गेल्याचा खुलासा पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड आणि विदेश मंत्रालयाने केला आहे. मृत्युमुखी पडलेल्या गोरखा सैनिकांचे मृतदेह रशियातून आणले गेलेले नाहीत तसेच हिंदू असूनही त्यांचे मृतदेह रशियातच दफन करण्यात आले आहेत.
युद्धात जीवितहानी होत असूनही नेपाळी नागरिक रशियाच्या सैन्यात सामील होण्यासाठी उत्सुक आहेत. दरदिनी नेपाळचा एक नागरिक मॉस्को येथील नेपाळच्या दूतावासाकडून परत पाठविला जात आहे. हे नेपाळी नागरिक रशियाच्या सैन्यात सामील होण्यासाठी तेथे पोहोचत आहेत.
तर दुसरीकडे युद्धात मारले गेलेल्या नेपाळी नागरिकांचे मृतदेह मायदेशी परत आणण्यास नेपाळच्या सरकारला यश आलेले नाही. रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील 22 महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. नेपाळ सरकारने नागरिकांना रशियाच्या सैन्यात सामील होण्याची अनुमती दिलेली नाही. तरीही गोरखा मॉस्कोत दाखल होत आहेत. नेपाळ सरकारकडून केवळ ब्रिटन आणि भारतीय सैन्यात सामील होण्याची अनुमती देण्यात आली आहे.
नेपाळी गोरखा विविध देशांच्या सैन्यात सामील होत राहिले आहेत. सध्या अनेक नेपाळी तरुण रशियाच्या सैन्यात कार्यरत असून युक्रेनविरोधात युद्ध लढत आहेत. तर काही युवक हे युक्रेनच्या सैन्यातही सामील झाले असल्याची माहिती पंतप्रधान प्रचंड यांनी दिली आहे. रशियातील नेपाळचे राजदूत मिलान राज तुलाधार यांच्यानुसार रशियाच्या सैन्यात सुमारे 200 गोरखा सैनिक आहेत. रशियाच्या सैन्यात सामील होऊ पाहणाऱ्या नागरिकांना युक्रेन युद्धातील धोक्यांची जाणीव करून दिली जात असून तत्काळ मायदेशी परतण्यास सांगण्यात येत असल्याचे तुलाधार यांनी म्हटले आहे.
नेपाळच्या तरुणांना मोठी रक्कम देण्याचे आमिष दाखवून रशियात पाठविले जात आहे. नेपाळी युवक 10 लाख रुपये एजंटला देऊन तस्करीमार्गे रशियात पोहोचत आहेत.