ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळविणाऱ्यांना 6 कोटी
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा : क्लास वन सरकारी नोकरी
प्रतिनिधी/ बेंगळूर
चांगले प्रशिक्षण, प्रशिक्षक आणि सुविधा असतील तर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणे कठीण नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा, असे आवाहन त्यांनी केले. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या राज्यातील खेळाडूंना 6 कोटी रुपयांचे बक्षीस आणि क्लास वन दर्जाची सरकारी नोकरी देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
युवा सबलीकरण आणि क्रीडा खात्याने आयोजित केलेल्या 2022 आणि 2023 सालातील एकलव्य, जीवनगौरव, कर्नाटक क्रीडा रत्न आणि 2023 सालातील कर्नाटक क्रीडा पोषक पुरस्कार समारंभात बोलत होते. राज्य सरकारने क्रीडा विकासासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या राज्यातील खेळाडूंना 6 कोटी रुपये रोख बक्षीस, क्लास वन 1 सरकारी नोकरी, रौप्यपदक विजेत्यांना 4 कोटी रु. व कांस्यपदक विजेत्यांना 3 कोटी रु. बक्षीस दिले दिले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
एकलव्य पुरस्काराच्या रकमेत वाढ
दोन वर्षातील एकूण 30 जणांना एकलव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. 4 लाख रु. रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मी या पुरस्काराची रक्कम वाढविली आहे. पुढील वर्षापासून अधिकाऱ्यांना संबंधित वर्षाचे पुरस्कार संबंधित वर्षातच प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्याला चांगले खेळाडू प्रदान करणाऱ्या प्रशिक्षकांना एकूण 9 जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत आहेत. यात 3 लाख रुपयांचे रोख बक्षीस समाविष्ट आहे. ग्रामीण आणि पारंपारिक खेळांमध्ये कामगिरी करणाऱ्यांना खेळाडूंना 15 क्रीडा रत्न पुरस्कार देण्यात आले आहेत. 2 लाख रु. यात समाविष्ट आहे. कर्नाटक क्रीडा पोषग पुरस्कार हा राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या खाजगी संस्थांना सन्मानित करण्यासाठी देण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पकमध्ये सहभागी होणाऱ्या 60 जणांची निवड केली आहे. त्यांना त्यांच्या प्रशिक्षण कालावधीत दरवर्षी 10 लाख रुपये दिले जात आहेत. चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सरकार सर्व प्रकारचे प्रोत्साहन देईल, असे ते म्हणाले.