6 कंपन्यांच्या भांडवल मूल्यात 1.18 लाख कोटींची वाढ
टीसीएस, स्टेट बँकेचे मूल्य वाढले : भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हरचे मूल्य घटले, सेन्सेक्स 659 अंकांनी होता वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
शेअरबाजारातील आघाडीवरच्या 10 पैकी सहा कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये 1.18 लाख कोटी रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी संपलेल्या आठवड्यामध्ये आघाडीवरच्या दहा पैकी सहा कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य एकत्रितरित्या 1 लाख 18 हजार 626 कोटी रुपयांनी वाढले असल्याचे पाहायला मिळाले आहे. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस ही कंपनी सर्वाधिक बाजार भांडवल मूल्य वाढ करण्यामध्ये यशस्वी झाली आहे.
सेन्सेक्स 659 अंकांनी तेजीत
मागच्या आठवड्यात पाहता मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 659 अंकांनी वाढत बंद झाला होता. यासोबत राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 187 अंकांनी वाढत बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस आणि आयटीसी या कंपन्यांच्या बाजारमूल्यामध्ये वाढ झाली आहे.
यांचे मूल्य व ाढले
रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मागच्या आठवड्यामध्ये 34507 कोटी रुपयांनी वाढत 17 लाख 59 हजार 276 कोटी रुपयांवर पोहोचले आहे तर आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य 24919 कोटी रुपयांनी वाढत 6,14,766 कोटी रुपयांवर तर एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य 2907 कोटी रुपयांनी वाढत 14,61,842 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल मूल्य 1472 कोटी रुपयांनी वाढत 7 लाख 12 हजार 854 कोटी रुपयांवर स्थिरावले आहे. आयटीसीचे बाजार भांडवल मूल्य 1126 कोटी रुपयांनी वाढत 5 लाख 35 हजार 792 कोटी रुपयांवर पोहोचले.
यांच्या भांडवल मूल्यात घसरण
दुसरीकडे भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 41 हजार 967 कोटी रुपयांनी कमी होत 10 लाख 35 हजार 274 कोटी रुपयांवर घसरले तर हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल मूल्य 10 हजार 114 कोटी रुपयांनी कमी होत ते 5 लाख 47 हजार 830 कोटी रुपयांवर राहिले. वित्त क्षेत्रातील बजाज फायनान्सचे बाजार भांडवल मूल्य 1863 कोटी रुपयांनी कमी झाले आहे.