‘ट्रम्प’ मोबाईल नावाचा 5 जी स्मार्टफोन लाँच
सुरुवातीची किंमत 42,900 रुपयांना : सप्टेंबरपासून विक्री सुरु होणार
न्यूयॉर्क :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कंपनी ट्रम्प ऑर्गनायझेशनने 16 जून रोजी ट्रम्प मोबाईल नावाचा एक नवीन स्मार्टफोन ब्रँड आणि नेटवर्क सेवा लाँच केली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ही नवीन कंपनी न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवरमध्ये लाँच करण्यात आली आहे.
या ब्रँडने टी1 नावाचा 5जी स्मार्टफोन लाँच केला आहे, ज्याची किंमत 499 अमेरिकन डॉलर आहे, म्हणजे सुमारे 42,900 रुपये. हा स्मार्टफोन पूर्णपणे अमेरिकेत बनवला जाईल. तो अधिकृत वेबसाइटवरून 100 डॉलरमध्ये बुक करता येईल. परंतु यांची विक्री सप्टेंबरपासून सुरू होईल. नेटवर्क सेवा देखील सप्टेंबरपासून सुरू होईल. या अंतर्गत, ‘द 47 प्लॅन’ नावाचा मासिक प्लॅन सादर करण्यात आला आहे. त्याची किंमत 47.45 डॉलर आहे, जी अंदाजे 3,950 आहे. यामुळे तुम्हाला अमर्यादित कॉल करता येतील. टेलिमेडिसिन आणि रोडसाईड असिस्टन्स सारख्या सुविधा देखील उपलब्ध असतील.
ट्रम्प ऑर्गनायझेशन स्वत: फोनची रचना, उत्पादन किंवा सेवा करणार नाही. टी1 मोबाइल एलएलसी नावाची दुसरी कंपनी स्थापन केली जाईल. ट्रम्पने एलएलसीसोबत त्यांच्या ब्रँड नावासाठी परवाना करार केला आहे. कंपनी 3 वायरलेस सेवा प्रदात्यांकडून नेटवर्क क्षमता खरेदी करेल.
ट्रम्प टॉवरमधील लाँचिंग कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर म्हणाले की या योजनेअंतर्गत ग्राहकांना केवळ मोबाइल नेटवर्कच नाही तर इतर अनेक सुविधा देखील मिळतील. आम्ही उद्योगातील सर्वोत्तम तज्ञांशी भागीदारी केली आहे.