भारती एअरटेलकडून या महिन्यातच 5 जी सेवा
कंपनीच्या सीईओंचा विश्वास : काम प्रगतीपथावर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेल आपली 5 जी सेवा या महिन्याअखेरपर्यंत सुरू करणार असल्याचे समजते. तशी माहिती कंपनीच्यावतीने देण्यात आली आहे.
सदरची सेवा सुरू करण्यासंदर्भातली तयारी कंपनी अंतिम टप्प्यात आणली असून यासाठी एरिक्सन, नोकीया व सॅमसंग यांच्यासोबत करार केला आहे. अलीकडेच 5 जी सेवेकरीता स्पेक्ट्रमसाठी भारतीएअरटेलने बोली लावली होती. 19867.8 मेगाहर्टझ स्पेक्ट्रम 900 मे.ह., 1800 मे. ह., 2100 मे. ह., 3300 मे. ह. आणि 26 गी. ह. लहरींकरीता बोली जिंकली आहे.
लवकरात लवकर 5 जी सेवा देण्यासाठी कंपनी उत्सुक असून याच महिन्यात ही सेवा सादर केली जाणार असल्याचे एअरटेलचे सीईओ व एमडी गोपाल विठ्ठल यांनी सांगितले. नेटवर्कसंबंधीत करार अंतिम टप्प्यात असून तंत्रज्ञान सहाय्यक भागीदारांच्या सहाय्याने सेवा प्रदान करण्यासाठीच्या आवश्यक कार्याला वेग दिला जात आहे. भारताच्या डिजिटल क्रांतीत अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी 5 जी सेवा ही महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारती एअरटेलने स्पेक्ट्रम लिलावात 43 हजार कोटींची बेली प्राप्त केली आहे.