भारतीय सैनिकांना 5 जी संपर्क व्यवस्था
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
लडाखसारख्या उंचीवरील प्रदेशात सीमा सुरक्षेचे कर्तव्य करणाऱ्या भारताच्या सैनिकांना आता 4 जी आणि 5 जी संपर्कव्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भारताची लडाख सीमा चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना लागून आहे. त्यामुळे येथील सैनिकांवर उत्तरदायित्व मोठे आहे. त्यांना जास्तीत जास्त आधुनिक शस्त्रे आणि इतर साधने उपलब्ध करुन देण्याचा भारताच्या सरकारचा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे सैनिकांच्या सुरक्षा क्षमतेत मोठी वाढ होणार आहे, अशी माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
ही 4 जी आणि 5 जी सुविधा अत्यंत दुर्गम आणि बिकट परिस्थितीत सीमासंरक्षण करणाऱ्या सैनिकांना देण्यात येणार आहे. लडाख क्षेत्रातील गलवान, दौलत बेग ओडी, चुमार, बाटालिक आणि द्रास येथे सैनिकांना ही अत्याधुनिक संपर्क यंत्रणा पुरविण्यात येणार आहे. यामुळे सैनिकांना आपल्या कुटुंबियांशी देखील संपर्क करता येणार असल्याने त्यांच्या नितीधैर्यात या निर्णयामुळे वाढ होऊ शकते. ही क्षेत्रे अत्यंत दुर्गम असल्याने तेथून अन्यत्र संपर्क करणे अत्यंत कठीण होते. तथापि, या सुविधेमुळे ही त्रुटी दूर झाली आहे, अशी माहिती देण्यात आली.
मोक्याच्या स्थानी सुरक्षा
लडाख सीमेवर अनेक अत्यंत संवेदनशील आणि मोक्याची स्थाने आहेत. तेथे सैनिकांना रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून भारताच्या सीमेचे संरक्षण करावे लागते. तेथे त्यांना अत्याधुनिक साधनांची आवश्यकता भासते. ही कनेक्टिव्हिटी त्यांना भारत सरकारने तांत्रिक सुधारणा करुन उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती देण्यात आली आहे. सीमेवर असणाऱ्या एएलजी या भागात काम करताना ही सुविधा विशेषत्वाने उपयोगी ठरणार आहे. सीमा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा काराकोरम मार्ग याच भागातून जातो. त्यामुळे ही सुविधा भारताच्या सैनिकांना देशाच्या संरक्षणासाठी अत्याधिक उपयोगाची ठरणार आहे.