डिझेल निर्यातीत 58 टक्के वाढ, पेट्रोल विक्री वाढली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
युरोपियन संघातील देशांना भारतातून होणाऱ्या डिझेलच्या निर्यातीत 58 टक्के इतकी वाढ झाल्याची माहिती आहे. 2024 च्या पहिल्या तीन तिमाहीत ही स्थिती दिसून आली आहे.
भारताच्या इंधन निर्यातीत डिझेलचा वाटा अधिक राहिला आहे. मध्यंतरी रशियाकडून भारताने स्वस्तात कच्च्या तेलाची आयात केली होती. भारत देश हा रशियातून कच्चे तेल मागवणारा दुसरा मोठा देश आहे. युक्रेन युद्धापूर्वी 1 टक्के इतके आयातीचे असणारे प्रमाण आता 40 टक्के इतके झालेले असल्याचे सांगण्यात येते.
पेट्रोलच्या विक्रीत 8 टक्के वाढ
याचदरम्यान गेल्या ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल आणि विमानाचे इंधन यांच्या विक्रीत 8.5 टक्के इतकी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. मागच्या महिन्यात दसरा, दिवाळी हे उत्सव असल्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक राहिली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांसाठी डिझेल हे मुख्य इंधन असून याचा वापर फारसा वाढीव दिसला नाही. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसच्या विक्रीत 7.5 टक्के इतकी वाढ दिसून आली. पावसाचे वाढलेले प्रमाण, इलेक्ट्रिक वाहन घेण्याकडे वाढता कल हे कारणसुद्धा डिझेलच्या विक्रीवर नकारात्मक परिणाम करणारे ठरले.