रेशन तांदळाच्या काळाबाजार प्रकरणी 570 जणांना अटक
अन्न-नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांची माहिती : जानेवारीपासून बीपीएल कार्डधारकांना ‘इंदिरा किट’चे वितरण
बेळगाव : अन्नभाग्य योजनेतील तांदळाची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री प्रकरणी राज्यभरात 570 जणांना अटक करण्यात आली आहे. संबंधितांकडून 29,603.15 क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला असून 314 वाहने जप्त करण्यात आली आहेत. रेशन तांदळाचा बेकायदेशीर साठा व विक्री रोखण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी देखरेखीचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची आवश्यकता नसून अधिकारी आपले कर्तव्य बजावत आहेत. जानेवारी महिन्यापासून राज्यातील बीपीएल कार्डधारकांना इंदिरा किटचे वितरण सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी दिली.
विधानपरिषदेत भाजपचे सदस्य सी. टी. रवी यांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी व कर्मचारी बेकायदेशीर रेशन तांदळाची विक्री रोखण्यासाठी आपले कार्य चोखपणे बजावत आहेत. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कारवाई सुरुच असून राज्य सरकार तांदळाची बेकायदा विक्री रोखण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलत आहे. यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची आवश्यकता नसून सरकार गोरगरिबांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
विरोधी आमदार आक्रमक
मंत्री मुनियप्पा यांनी समर्पक उत्तर न दिल्याने विरोधी पक्षाच्या आमदारांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र पंचायतराज मंत्री प्रियांक खर्गे मुनियप्पा यांच्या मदतीला धावून आले. खर्गे यांनी तसेच जमखंडी येथील पत्रकाराच्या हत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येत असून या प्रकरणी अनेक संशयितांना अटक केल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे पदाधिकारीच रेशन तांदळाच्या काळाबाजारात सामील असल्याचा आरोप केला. यामुळे सभागृहात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. यावेळी विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी आक्रमक झाले. त्यांनी,
आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा राज्य सरकारने रेशन तांदळाचा काळाबाजार थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला दिला. मंत्री मुनियप्पा म्हणाले, यादगिरी जिल्ह्यातील अन्न व नागरी पुरवठा खात्यातील अधिकारी तांदळाच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणात आढळून आले होते. यामुळे त्यांचे तत्काळ निलंबन काले. रेशन तांदळाचा साठा व विक्री प्रकरणात सहभाग असलेल्यांवर जीवनावश्यक वस्तू कायदा-1955 अंतर्गत फौजदारी खटला चालविण्यात येणार आहे. तसेच रेशनकार्डधारकांकडून तांदळाची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास त्यांचे रेशनकार्ड रद्द केले जाईल.
इंदिरा किटसाठी विशेष निधी
जानेवारी महिन्यापासून राज्यातील बीपीएल कार्डधारकांना इंदिरा कीटचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये विविध पौष्टीक आहार धान्य व तेल, मीठ, सेंद्रीय गुळ आदींचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने विशेष निधीची तरतूद केली असून जानेवारीपासून वाटपास प्रारंभ होणार आहे.
विधानपरिषदेतही दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली...
सोमवारी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरळीपणे प्रारंभ झाला. विधानपरिषदेच्या कामकाजाला सकाळी 11.30 च्या सुमारास सुरुवात झाली. माजी विधानपरिषद सदस्य के. नरहरी, माजी आमदार आर. व्ही. देवराज, दिवंगत आमदार एच. वाय. मेटी, लेखक एस. एल. भैरप्पा, पद्मभूषण टी. जे. एस. जॉर्ज, गीतकार अनुराधा धारेश्वर, पद्मश्री सालूमरद तिम्मक्का, प्रसिद्ध अभिनेते धर्मेद्र यांना श्रद्धांजली वाहून कामकाजाला सुरुवात करण्यात आली.