565 पोलिसांच्या बदल्या
859 नवे कॉन्स्टेबल नियुक्त
प्रतिनिधी/ पणजी
गोवा पोलिस खात्यात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून दोन निरीक्षकांसह 565 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर नव्याने भरती झालेल्या 859 पोलिस कॉन्स्टेबल्सना विविध पोलिस स्थानकात नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांची कार्यक्षमता मोठ्या
प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. बदली झालेल्या पोलिसांमध्ये निरीक्षक फिलोमेन कॉस्ता यांना जीआरपीमधून फातोर्डा वाहतूक पोलिस स्थानकात बदली करण्यात आली तर निरीक्षक जॉन फर्नांडिस यांना वाळपई पोलिस प्रशिक्षण विभागातून सुरक्षा विभाग पणजी येथे हलविण्यात आले आहे. तसेच 34 उपनिरीक्षक आणि इतर पोलिस मिळून तब्बल 565 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यातील 60 जणांची पोलिस नियंत्रण कक्षात नियुक्ती केली आहे.
नव्याने भरती झालेल्या 859 पोलिस कॉन्स्टेबल्सची वेगवेगळ्या पोलिस स्थानकात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस दलाची कार्यक्षमता वाढण्याची शक्यता आहे. तसेच राज्य गृह मंत्रालयाने तब्बल 82 नव्या पदांची नियुक्त करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदासाठी 27 आणि हेड कॉन्स्टेबलच्या (ड्रायव्हर) पदासाठी 55 पदे आहेत. त्यामुळे पोलिस खात्याच्या कार्यपद्धतीला मोठी गती मिळणार, अशी अपेक्षा आहे.
पोलिस खात्यात काही कार्यकाळ एका जागी सेवा बजावल्यानंतर त्यांची बदली केली जाते. मात्र त्या बदल्या कागदोपत्रीच राहतात, असे अनेकवेळा दिसून आले आहे. बदलीचा आदेश जारी होऊनही काही पोलिस कर्मचारी आपली जागा सोडत नाही. कुणा राजकीय नेत्यांचा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वशिला लावून ते असलेल्या ठिकाणीच चिकटून राहतात त्यात त्यांचा मोठा फायदा असतो. आता बदलीचा आदेश जारी करण्यात आला आहे. तब्बल 565 पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र ज्या पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत ते आपल्या नव्या जागेवर जातील की बदली केवळ कागदोपत्री मर्यादित राहणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.