डॉक्टर दांपत्याची 55 लाखांची फसवणूक
गुंतवणुकीचा सल्ला देऊन ठकविले : गुलबर्गा जिल्ह्यातील एका युवकावर एफआयआर दाखल
प्रतिनिधी/ बेळगाव
भरपूर नफा मिळवून देण्याचे सांगून एका डॉक्टर दांपत्याला 55 लाख रुपयांना ठकवण्यात आले आहे. यासंबंधी गुलबर्गा जिल्ह्यातील एका युवकावर टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
अयोध्यानगर येथील एका डॉक्टर दांपत्याची फसवणूक केल्याच्या आरोपावरून प्रभूलिंग महादेव पूलर, रा. आलूर बी., ता. आळंद, जि. गुलबर्गा सध्या रा. शांतीनगर-टिळकवाडी याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भादंवि 406, 420 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टर दांपत्याची भेट घेऊन प्रभूलिंगने ब्लूचिप कॉर्पोरेट इन्व्हेस्टमेंट सेंटर प्रा. लि. मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. त्याचे कार्यालय आरपीडी सर्कलजवळ होते. त्याच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी गुंतवणूक केली. मुदत संपल्यानंतर त्याने रक्कम परत केली. त्यामुळे त्याच्यावर विश्वास बसला.
जेरोडा ब्रोकिंग लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा येतो, असा सल्ला प्रभूलिंगने दिला. त्याच्या सांगण्यावरून 31 ऑक्टोबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत डॉक्टरांनी 42 लाख 48 हजार 855 रुपये प्रभूलिंगच्या बँक खात्यात जमा केले. त्यांच्या पत्नीने 5 नोव्हेंबर 2020 ते 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत 13 लाख 10 हजार रुपये जमा केले.
डॉक्टर दांपत्याने आपण केलेली गुंतवणूक व त्याचा नफा देण्याची मागणी प्रभूलिंगकडे केली. रक्कम परत करण्याचे सांगून 10 जानेवारी 2024 पासून तो फरारी झाला आहे. यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याने एकूण 55 लाख 58 हजार 855 रुपयांची फसवणूक केली आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी पुढील तपास करीत आहेत.
शेअरबाजारात गुंतवणूक केल्यास चांगला नफा देण्याचे सांगून कोल्हापूरच्या एका सल्लागाराने बेळगाव येथील 23 जणांना अडीच कोटी रुपयांना फसवल्याची घटना घडली आहे. यासंबंधी सीईएन पोलीस स्थानकात अतुल कल्याणी (वय 46) रा. करवीर कॉलनी, रुकडी, जि. कोल्हापूर याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जाधवनगर परिसरात कार्यालय थाटून अतुलने सुमारे 23 जणांची फसवणूक केल्याचे सीईएन पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर पुढील तपास करीत आहेत.