नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत 53 हजार 117 शेतकरी
कोल्हापूर / कृष्णात चौगले :
जिह्यात झालेली अतिवृष्टी व महापुरामुळे 47 हजार 891 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. कृषी व महसूल विभागाकडून या पिकांचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार जिह्यातील 57 हजार 774 शेतकऱ्यांना 51 कोटी 9 लाख रूपये नुकसान भरपाईची रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली आहे. तर 39 हजार 394 शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली असली तरी शासनाकडून निधीची तरतूद केली नसल्यामुळे त्यांना अद्याप भरपाईची रक्कम मिळालेली नाही. तसेच 13 हजार 723 शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी पूर्ण केली नसल्यामुळे त्यांनाही भरपाईचा लाभ मिळालेला नाही. म्हणजेच जिह्यात एकूण 53 हजार 117 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित असून ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांनी 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.
जिह्यात जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच नद्यांना महापूर आला. अतिवृष्टी काळात नद्यांची पाणी पातळी गतीने वाढत गेल्यामुळे महापुराची परिस्थिती ओढावली. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतरही नद्यांच्या पाणी पातळीत संथ गतीने घट झाली. परिणामी सुमारे दहा दिवसांहून अधिक काळ पिके पाण्याखालीच राहिल्यामुळे पूर्णत: कुजून गेली. महापूर ओसरल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे गतीने पंचनामे केले. त्यानुसार जिह्यातील 47 हजार 891 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये जिरायती पिके 7500 हेक्टर, बागायती पिके 40,300 हेक्टर आणि फळबागांचे 37 हेक्टर वरील क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
1 लाख 10 हजार 891 शेतकरी भरपाई देण्यासाठी पात्र
जिह्यातील एकूण 1 लाख 62 हजार 800 इतक्या शेतकऱ्यांची पिके पूरबाधित झाली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना 122.42 कोटींचा फटका बसला आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार कृषी विभागाने महापूर बाधित पिकांचे पंचनामे पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार सद्यस्थितीत 1 लाख 10 हजार 891 शेतकरी भरपाईची रक्कम देण्यासाठी पात्र ठरले असून त्यांना शासनाने 93 कोटी 31 लाख 3 हजार 939 इतकी भरपाई देण्यासाठी मान्यता दिली आहे.
31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसीसाठी मुदत
पूरग्रस्त व अतिवृष्टीमध्ये बाधित पिकांच्याशेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी आधार कार्ड आणि आधारकार्डशी संलग्नित असलेला मोबाईल क्रमांक आणि बँक पासबुकसह लाभार्थ्यांने स्वत: संबधित महा-ई सेवा केंद्र अथवा ज्या ठिकाणी ई-केवायसी केली जाते, तेथे जाऊन 31 डिसेंबरपर्यंत ई केवायसी करणे आवश्यक आहे. केवायसीसाठी 31 डिसेंबरपर्यंतच अंतिम मुदत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत 13 हजार 723 शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. तरच पिक नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे.
अशी मिळणार नुकसान भरपाई
बागायती पिक : प्रतिगुंठा 175 रूपये (हेक्टरी 17 हजार 500 रूपये )
जिरायत/ कोरडवाहू : प्रतिगुंठा 85 रूपये (हेक्टरी 8500 रूपये )