अमेरिकेतील टेक्सासमध्ये पुरामुळे 51 जणांचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे पूरस्थिती : अनेकांना वाचवण्यात यश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेतील टेक्सास राज्यात मुसळधार पावसानंतर ग्वाडालुप नदीत अचानक आलेल्या पुरामुळे 51 जणांचा मृत्यू झाला आहे. नदीपात्रात मुलींसाठी एक उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले. याचदरम्यान पूर आल्यामुळे शिबिरातील छावणीत उपस्थित असलेल्या सुमारे आठशे मुलींपैकी 27 मुली बेपत्ता आहेत. 750 मुलींना वाचवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. टेक्सासचे राज्यपाल ग्रेग अॅबॉट यांनी पूरपरिस्थिती लक्षात घेता आपत्कालीन इशारा कायम ठेवला आहे.
गेल्या दोन दिवसात टेक्सासमधील सॅन अँटोनियोमध्ये सुमारे 15 इंच (38 सेमी) पाऊस पडला. अवघ्या 45 मिनिटांत नदीची पातळी 26 फूट (8 मीटर) वाढल्यामुळे घरे आणि वाहने वाहून गेली. याचाच फटका विद्यार्थ्यांच्या शिबिरालाही बसला आहे. पुराचा धोका अजूनही कायम आहे. मदत व बचाव पथके सक्रिय झाली आहेत. नऊ बचाव पथके, 14 हेलिकॉप्टर आणि 12 ड्रोनच्या मदतीने बेपत्ता लोक व मुलींचा शोध सुरू असल्याचे टेक्सासचे गव्हर्नर डॅन पॅट्रिक यांनी सांगितले. टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथे मुसळधार पावसात 1,000 हून अधिक बचाव कर्मचारी बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात गुंतले आहेत. पूरस्थिती गंभीर होण्याचा धोका अजूनही कायम आहे.
पंतप्रधान मोदींचे ट्विट
पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ वर पोस्ट करत टेक्सासमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे झालेल्या मुलींच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी बाधित कुटुंबांप्रती सहानुभूती व्यक्त केली.
पुरामुळे 2,600 घरांची वीज गुल
पावसामुळे नदी, नाले आणि अन्य जलमार्ग ओसंडून वाहत असून बरेच रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. पुरामुळे वीज तारा कोसळल्या असून केर्व्हिलच्या आसपासच्या परिसरातील सुमारे 2,600 घरांमधील वीज दोन दिवसांपासून गायब झाली आहे. पुराच्या पाण्यात ट्रेलर आणि वाहने वाहून गेली. सॅन अँटोनियो आपत्कालीन पथकांनी हेलिकॉप्टर आणि ड्रोनद्वारे शोध आणि बचावकार्य सुरू केले आहे. पुराचे पाणी अचानक वाढल्यामुळे लोकांना झाडांवर चढून आपले प्राण वाचवावे लागले.