इस्रायलच्या हल्ल्यात 51 ठार
इस्रायलच्याही चार सैनिकांचा मृत्यू, संघर्षाच्या तीव्रतेत आणखी वाढ, शस्त्रसंधीची शक्यता धूसर
वृत्तसंस्था / जेरुसलेम
इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ले सुरूच ठेवले असून सोमवारी पेलेल्या वायुहल्ल्यात हिजबुल्लाचे 51 हस्तक ठार झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. हिजबुल्लानेही इस्रायलच्या लेबनॉनमध्ये प्रवेश केलेल्या सैनिकांच्या एका तुकडीवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात चार सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला इस्रायलनेही दुजोरा दिला आहे.
इस्रायलने रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर हिजबुल्लाच्या अनेक तळांवर वायुहल्ले केले आहेत. या हल्ल्यांची तीव्रता मोठी होती. हिजबुल्लाचे अनेक बंकर उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या संघटनेच्या उरलेल्या म्होरक्यांना लक्ष्य करण्याची इस्रायलची योजना आहे. त्यामुळे हे म्होरके वास्तव्यास असलेल्या ठिकाणांवर अचूक हल्ले केले जात आहेत. गेल्या 24 तासांमध्ये मोठी हानी करण्यात आली आहे.
हिजबुल्लाचा ड्रोन हल्ला
हिजबुल्लानेही इस्रायलवर ड्रोन हल्ला केला आहे. इस्रायली सेनेच्या काही तुकड्या दक्षिण लेबनॉनमध्ये उतरल्या आहेत. हिजबुल्लाचे तळ ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या सैनिक तुकड्यांवर हिजबुल्लाही ड्रोनच्या साहाय्याने हल्ला करीत आहे. या हल्ल्यात सोमवारी इस्रायलचे चार सैनिक मृत्यूमुखी पडले. या घटनेला इस्रायलच्या सैन्यदलाने दुजोरा दिला असून या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हिजबुल्लाने मिरसाद 1 या ड्रोनचा उपयोग केला आहे.
20 वर्षांमध्ये विकसीत
हे ड्रोन हिजबुल्लाने इराणच्या साहाय्याने गेल्या 20 वर्षांमध्ये विकसीत केल्याचे बोलले जाते. यासाठी रशिया किंवा चीनने तंत्रज्ञान पुरविल्याचाही आरोप केला जातो. हे ड्रोन चाळीस किलो स्फोटके वाहून नेण्यास सक्षम आहे. या ड्रोनच्या साहाय्याने इस्रायलच्या आतल्या भागात हल्ले करण्याची क्षमता हिजबुल्लाने प्राप्त केली आहे, असे या संघटनेचे म्हणणे आहे. गेल्या वर्षभरात असे अनेक हल्ले या संघटनेने केले. तथापि, ते निकामी करण्यात इस्रायलला यश आले आहे.
अमेरिकेचे संरक्षण
अमेरिकेने इस्रायलला ड्रोन विरोधी सुरक्षा तंत्रज्ञान देण्याचा निर्णय घेतला आहे. या संघर्षात अद्याप अमेरिकेने सक्रिय भाग घेतलेला नाही. तरीही या भागातील आपल्या सैनिकी तळांचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकेने अनेकवेळा लेबनॉनवर वायुहल्ले केले आहेत. हिजबुल्ला समवेत आता लेबनॉनचे अधिकृत सैन्यही या संघर्षात भाग घेत आहे. इस्रायलची सुरक्षा हा अमेरिकेच्याही प्रतिष्ठेचा विषय आहे.
शांततेचे प्रयत्न असफल
इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील संघर्ष थांबविण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. तथापि, इराण आणि हिजबुल्ला यांनीही चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केल्याशिवाय ही बोलणी सुरु होऊ शकत नाहीत. अद्याप इस्रायल आणि हिजबुल्ला यांनी चर्चेद्वारे तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. इस्रायलकडून इराणवर हल्ला होण्याची शक्यताही मिटलेली नाही. अशा स्थितीत हा संघर्ष लवकर थांबण्याची शक्यता दिसत नसल्याचे मत आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी व्यक्त केले.
गाझावरही हल्ले
हिजबुल्लाविरोधात कारवाई करताना इस्रायलने गाझा पट्टीकडे दुर्लक्ष केलेले नाही. हमास या संघटनेची शक्ती बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात इस्रायलला यश आल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या आघाडीवर सध्या शांतता नसली तरी तीव्र संघर्ष होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आता इस्रायलने आपले लक्ष लेबनॉनकडे वळविले असले तरी गाझापट्टीवरही इस्रायलची विमाने हल्ले करीत आहेत.