सारस्वत बँकेला 502 कोटींचा निव्वळ नफा
बँकेची 106 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
मुंबई : सारस्वत बँक या भारतीय सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेची 106 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. 27 रोजी प्रा. बी. एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्या संकुल, दादर (पूर्व) येथे पार पडली. यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी नमूद केले की, बँकेने व्यवसायाचा 82,000 कोटींचा टप्पा पार केला असून 31 मार्च रोजी बँकेचा एकूण व्यवसाय रु. 82,024.77 कोटींवर पोहोचला. यात रु. 49,457.31 कोटी ठेवींचा आणि रु. 32.567.46 कोटी कर्जांचा समावेश आहे. बँकेचा ढोबळ नफा रु. 786.43 कोटी आणि निव्वळ करोत्तर नफा गतवर्षीच्या रु. 351 कोटींवरून रु. 501.99 कोटी इतका झाला, जो बँकेच्या 106 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक व नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या इतिहासात सर्वोच्च नोंदविला गेला. बँकेने भविष्यातील जोखीम नियंत्रणाकरिता 125 कोटी अतिरिक्त फ्लोटींग निधींची तरतूद करूनही निव्वळ नफ्यात झालेली वाढ उल्लेखनीय आहे. अशा अतिरिक्त फ्लोटींग निधीची तरतूद करण्याचे प्रयोजन हा सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक अनोखा उपक्रम आहे. ही फ्लोटींग निधीची तरतूद बँकेने केली नसती तर बँकेचा निव्वळ नफा रु. 628 कोटी झाला असता.
बँकेची ढोबळ अनुत्पादित कर्जे 2.88 टक्के इतकी म्हणजेच बँकेच्या इतिहासात सर्वात कमी म्हणून नोंदविली गेली. निव्वळ अनुत्पादित कर्जे सलग 2 वर्षांपासून शून्य टक्क्यावर राहिली. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण 17.28 टक्के आहे. बँकेने दि. 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाकरिता इक्विटी भागधारकांना 17.50 टक्के लाभांश जाहीर केला. बँकेने आपली अॅसेट क्वॉलिटी आणि नफ्यामध्ये लक्षणीय सुधारणा करण्याबरोबरच तिचे इतर सर्व आर्थिक निकष सुदृढ करण्यावरही भरदिला आहे. बँकेने स्थापनेपासूनच सातत्याने नफा मिळवत भागधारकांना लाभांश दिला आहे. बँकेच्या 302 शाखांच्या विस्ताराचे जाळे भारतातील महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या सहा राज्यांत पसरले असून सुमारे 4500 कर्मचारीवृंद कार्यरत आहेत.
बँकेने सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून नेहमीच समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण करण्याकरिता वेळोवेळी भरीव योगदान दिले आहे. यावर्षी बँकेने आपले सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारून समाजातील गरजू लोकांकरिता शैक्षणिक आणि आरोग्य सेवा घटकांवर आपले लक्ष केंद्रित केले. याहीवर्षे टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट ग्रुपला शस्त्रक्रियेसाठी अत्यावश्यक उपकरणाच्या खरेदीकरिता 2.51 कोटी तसेच बी.वाय.एल.नायर हॉस्पिटल-मुंबई सेंट्रल येथील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांच्या उपचाराकरिता रु. 50 लाख आणि कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाकरिता रु. 30 लाख रक्कम अनुदान रुपाने वितरित केली आहे. या अनुदानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवा क्षेत्रातील पोकळी भरून निघण्यास विशेष मदत होत आहे. गतवर्षीप्रमाणे अहवाल वर्षीसुद्धा ग्रामीण भागातील सरकारी शाळांची देखभाल व पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी बँकेने सुमारे 50 हून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या उपक्रमाकरिता आर्थिक मदत केली.