जिहादी कोर्समध्ये 5 हजार महिलांची भरती
महिलांना आत्मघाती हल्ल्याचे प्रशिक्षण : दहशतवादी अझहरचा दावा
वृत्तसंस्था/रावलकोट
मे महिन्यात भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये जवळपास सर्वस्व गमाविणारी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्याने आता जैशच्या महिला शाखेवरून अनेक दावे केले आहेत. या महिला शाखेत आतापर्यंत 5 हजार महिलांची भरती झाली असून या महिलांना आत्मघाती हल्ल्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा दावा मसूद अझहरने केला आहे. यापूर्वी अझहरने ऑक्टोबर महिन्यात जैशची महिला ब्रिगेड, जमात-उल-मोमिनात स्थापन करण्याची घोषणा केली होती. याची जबाबदारी मसूद अझहरची बहिण सईदा सांभाळत आहे. जमात-उल-मोमिनातचा प्रभाव वेगाने वाढत असल्याचा खुलासा मसूद अझहरने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे.
प्रत्येक जिल्ह्यात एक प्रमुख
मागील काही आठवड्यांमध्ये 5 हजारांहून अधिक महिला या समुहात सामील झाल्या आहेत. भरती आणि प्रशिक्षण सुविधाजनक करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरच्या अनेक जिल्ह्यांमध्ये समुहाचा विस्तार केला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक महिला प्रमुख असेल, तसेच तिला मुंतजिमा संबोधिण्यात येणार असून तिच्या नेतृत्वात एक कार्यालय स्थापन करण्यात येईल, जे शाखेच्या कारवायांवर नजर ठेवणार असल्याचा दावा मसूदने केला आहे.
ऑनलाइन जिहादी कोर्स
यापूर्वी जैश-ए-मोहम्मदने महिलांच्या भरतीसाठी एक ऑनलाइन जिहादी कोर्स सुरू केला होता, ज्याचे नाव ‘तुफात अल-मुमिनात’ ठेवण्यात आले आहे. जैशने या कोर्ससाठी प्रत्येक महिलेकरता 500 रुपयांचे शुल्कही निर्धारित केले आहे. पाकिस्तानात कट्टरवादी गट महिलांनी एकट्याने बाहेर पडणे योग्य मानत नाहीत, याचमुळे जैश आता महिलांच्या भरतीसाठी ऑनलाइन व्यासपीठांचा वापर करत आहे. इस्लामिक स्टेट आणि हमासच्या धर्तीवर महिला दहशतवादी ब्रिगेड तयार करत आत्मघाती हल्ल्यांसाठी त्यांचा वापर करण्याचा जैश-ए-मोहम्मदचा कट आहे.