झेप्टोने उभारले पाच हजार कोटी रुपये
किराणा सामान पोहचवणारी कंपनी : वर्षभरात समभाग बाजारात
वृत्तसंस्था/ कोलकाता
दहा मिनिटांमध्ये किराणा सामानाची पोहोच करणाऱ्या झेप्टो या कंपनीने 5560 कोटी रुपयांची उभारणी केली आहे. या निधी उभारणीनंतर कंपनीचे समभाग पुढील 12 ते 15 महिन्यांमध्ये बाजारात दाखल होणार आहेत. या नव्या रक्कम उभारणीनंतर कंपनीचे मूल्य 29 हजार 160 कोटी रुपयांपेक्षाही अधिक झाले आहे.
सदरच्या रक्कम उभारणीमध्ये आधीचे भागधारक स्टेप स्टोन ग्रुप, नेक्सस वेंचर पार्टनर्स, ग्लेड ब्रुक कॅपिटल, गुड वॉटर आणि लची ग्रुम यांची मदत झाली असल्याचे समजते. कंपनीचे सीईओ आदीत पालिचा म्हणाले की कंपनीकडे रक्कम पुरेशा प्रमाणात असून नव्याने झालेल्या निधी उभारणीच्या माध्यमातून आता शेअर बाजारामध्ये उतरण्यासाठी कंपनीला भक्कम पाठबळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. या निधीच्या माध्यमातून आयपीओ सादरीकरण करण्याचे कंपनीने निश्चित केले आहे.
व्यवसाय तेजीत
झेप्टोचा व्यवसाय तेजीने वाढत असून मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये कंपनीची विक्री दुप्पट होत असल्याचेही समोर आले आहे. कंपनीच्या ताफ्यामध्ये सध्याला 350 स्टोअर्सचा समावेश असून आगामी काळामध्ये यांची संख्या 700 पर्यंत वाढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
युनिकॉर्न कंपनी
देशातील दहा मोठ्या शहरांमध्ये 350 हून अधिक दुकाने कंपनीची कार्यरत आहेत. मागच्या वर्षीच कंपनी युनिकॉर्नमध्ये समाविष्ट झाली होती. युनिकॉर्न श्रेणीमध्ये यायचे असेल तर कंपनीला आपले मूल्य 834 कोटी रुपयांपेक्षा अधिक साध्य करावे लागते.