कसबा बीड परिसरात दुपारपर्यंत 50 टक्के मतदान
कसबा बीड :
आज 20 नोव्हेंबर रोजी मतदान दिवस असल्यामुळे या तिन्ही तालुक्यातील सर्व मतदार राज्याचा कौल कोणाकडे आहे ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.त्यामुळे आपल्या उमेदवाराला अधिक मतदान कसे होईल ? व आपला उमेदवार कसा निवडून येईल ? यासाठी प्रत्येक गावातील नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे.सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानात सरुवात झाली असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या वार्डमधील मतदान कसे जास्त होईल ? याकडे विशेष लक्ष दिलेले आहे .याचाच परिणाम म्हणून कसबा बीड भागामध्ये दुपारपर्यंत 50% मतदान अतिशय शांततेत व चुरशीत पार पडले आहे.
करवीर तालुक्यातील प्रामुख्याने भागातील पाडळी खुर्द ,कोगे,महे,कसबा बीड,सावरवाडी,गणेशवाडी ,धोंडेवाडी , केकतवाडी , शिरोली दुमाला , हिरवडे दुमाला , सडोली दुमाला , सावर्डे दुमाला, मांडरे, गर्जन ,चाफोडी आदी भागांमध्ये दिवंगत आमदार कै. पी एन पाटील यांचे सुपुत्र राहूल पी. पाटील व माजी आमदार चंद्रदीप नरके , जनसुराज्य पक्षाचे संताजी घोरपडे यांच्यामध्ये अत्यंत चुरशीने प्रचार यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती.यामध्ये प्रामुख्याने करवीर विधानसभा मतदारसंघातील करवीर, पन्हाळा, गगनबावडा या तालुक्यात केलेली विकास कामे, प्रलंबित असणारी विकास कामे,जनतेशी असलेला नेत्यांचा संपर्क , तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन,महिलांना दिलेल्या सुविधा व राबवलेल्या योजना,आदी विषयावर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार यंत्रणा व आरोप प्रत्यारोप यामधून शिगेला पोहचली होती.
करवीर तालुक्यातील संवेदनशील असणारे महे गाव येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून मतदारांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्या म्हणून मतदारांचे स्वागत करण्यासाठी गुलाबपुष्प,लहान मुलांसाठी पाळणाघर,ज्येष्ठ मतदारांना नेण्या आणण्यासाठी व्हीलचेअर,अशा विविध सोयी ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात आल्यामुळे मतदारांकडून महे ग्रामपंचायतचे कौतुक केले जात आहे.तसेच महे गावातील वार्ड क्रमांक 4 मध्ये आणखीन एका मशीनची सोय झाली असती तर बरे झाले असते असे मतदारांच्याकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत होत्या.जेणेकरून होणारी गर्दी टाळणे शक्य होईल.
पाडळी खुर्द कसबा बीड शिरोली दुमाला व बिडशेड येथील वाडी- वस्तीमध्ये ग्रामपंचायतच्या मार्फत जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न केले.कोगे येथील प्राथमिक शाळेमध्ये असणाऱ्या बोलक्या भिंती,चित्र व मुलांच्या विकासासाठी लिहिलेले सुविचार,तसेच ग्रामपंचायतने केलेली सुविधा यामधून मतदारांनी कसबा बीड परिसरातील ग्रामपंचायतींच्या सरपंच , उपसरपंच , ग्रामसेवक , सर्व सदस्य, कर्मचारी,व आशा वर्कर व आरोग्य विभागातील स्टाफ यांचे कौतुक केले.