समुदाय भवनसाठी पहिल्या टप्प्यात 50 टक्के रक्कम : तंगडगी
बेळगाव : गेल्या तीन वर्षात राज्यातील विविध समुदायांकरिता समुदाय भवन निर्माण करण्यासाठी 5 लाख रुपये किंवा त्याहून कमी अनुदान मंजूर केले आहे. तसेच मागणीनुसार समुदाय भवनांना मंजुरी देऊन त्यांना अनुदान देण्यात आले आहे. हे अनुदान तीन टप्प्यात देण्यात येत आहे. मंजूर झालेल्या अनुदानापैकी पहिल्या टप्प्यात 50 टक्के निधी देण्याची तरतुद करू, असे आश्वासन मागासवर्ग कल्याण मंत्री शिवराज तंगडगी यांनी दिले. विधानपरिषद सदस्य यतिंद्र यांनी मागासवर्गीयांसह विविध किती समुदाय भवनसाठी अनुदान मंजूर केले?, असा प्रश्न विचारून मंजूर केलेल्या अनुदानापैकी 50 टक्के रक्कम एकाच वेळी द्यावी. एकाच वेळी निम्मे पैसे दिल्यास समुदाय भवन निर्मितीच्या कामाला गती प्राप्त होईल, अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना मंत्री तंगडगी यांनी, मागासवर्गांसह विविध समुदायांसाठी समुदाय भवन निर्माण करण्यासाठी 5 लाख व त्याहून कमी अनुदान देण्यात येत आहे. तसेच मागणीनुसार समुदाय भवनांना मंजुरी देण्यात येत असून निर्माण करण्यासाठी निधीचीही तरतूद करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 25 टक्के रक्कम देण्यात येते. आपल्याकडेही मंजूर रकमेपैकी पहिल्या टप्प्यात जादा पैसे देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार आता मंजूर झालेल्या अनुदानापैकी एकाचवेळी 50 टक्के अनुदान मंजूर करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.