पर्यटन क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये 50 टक्के वाढ
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतातील पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये डिसेंबर 2022 ते डिसेंबर 2023 या काळात 50 टक्के वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. गेल्या काही महिन्यात प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. उद्योगाने वर्षापूर्वीच्या कालावधीच्या तुलनेत यंदा ब्लू-कॉलरयुक्त उमेदवारांच्या नियुक्तीमध्ये एकूण 8 टक्के वाढ पाहिली आहे.
साथीच्या रोगानंतर उल्लेखनीय सुधारणा
महामारीमुळे पर्यटन क्षेत्रात घट झाली होती, पण आता त्यात सुधारणा झाली आहे. कोरोना पूर्णपणे गेल्याने लोकांमध्ये प्रवास करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. कोरोनाने जगभरातून माघार घेतल्यानंतर अनेकांनी इतर देशांना भेटी देण्याचे प्रमाण वाढवले आहे. याचा फायदा हा भारतालादेखील झाला आहे. वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सील यांच्या अहवालात वरील माहिती समोर आली आहे. हवामानातील बदल, सणासुदीचा हंगाम आणि इतर कारणांमुळे हिल स्टेशन्सचा प्रवास अनेकांनी केला आहे. ऑक्टोबर हा पर्यटनासाठी लोकप्रिय काळ आहे. याच काळात नव्या उमेदवारांना पर्यटन उद्योगात कंपन्यांनी सामावून घेतले आहे.
दिल्ली आघाडीवर
दिल्ली-एनसीआर, मुंबई, बेंगळुरू, पुणे आणि कोची येथे पर्यटन क्षेत्रात सर्वाधिक भरती झाली असल्याची बाब सांगितली जात आहे. 23 टक्के नोकऱ्यांची उपलब्धता दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वाधिक झाली आहे. मुंबई आणि बेंगळुरूचे योगदान अनुक्रमे 5.19टक्के आणि 6.78 टक्के आहे. पुणे (2.33 टक्के) आणि कोची (2.41 टक्के) सह इतर शहरांनी वाढीमध्ये लक्षणीय योगदान दिले.