राजहंसगड विकासासाठी 50 लाखांचा निधी मिळणार
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची पर्यटनमंत्री एच. के. पाटील यांच्याशी चर्चा : पर्यटन विभागाला सूचना
बेळगाव : शहरापासून अवघ्या 16 कि.मी.वर असलेल्या राजहंसगडाचा विकास करण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पर्यटनमंत्री एच. के. पाटील यांची भेट घेतली. त्यांनी त्यांच्याकडे निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली. तातडीने एच. के. पाटील यांनी 50 लाखांचा निधी देण्यास संमती दर्शविली आहे. यामुळे पुन्हा राजहंसगडाचा कायापालट होणार आहे. राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला. याचबरोबर तेथील सिद्धेश्वर मंदिराचीही उभारणी करण्यात आली आहे. राजहंसगड गावापासून किल्ल्यापर्यंत डांबरी रस्ता करण्यात आला. याचबरोबर इतर विकास याठिकाणी करण्यात आला असून आणखी 50 लाखांचा निधी मिळविण्यासाठी मंत्री हेब्बाळकर यांनी प्रयत्न सुऊ केले आहेत. सध्या या गडाला जाणारा रस्ता खराब झाला आहे. त्याचबरोबर इतरही काही कामे प्रलंबित आहेत. त्यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे. शहरापासून 16 कि.मी.वर असलेल्या राजहंसगडावर पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. शहरालगतचे एक मोठे पर्यटनस्थळ निर्माण झाले आहे. दररोज पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यापूर्वी विकासासाठी मोठा निधी उपलब्ध केला होता. त्यानंतर आता पर्यटनमंत्री एच. के. पाटील यांची भेट घेऊन त्यांना या किल्ल्याबाबतची माहिती दिली. एच. के. पाटील यांनीही तातडीने पर्यटन विभागाला याबाबत निधी मंजूर करण्याची सूचना दिली आहे.