आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन सेंटरला 50 कोटींचा निधी
कोल्हापूर :
राजाराम तलाव येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेशन सेंटर उभारण्याची मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली होती. विधानसभा निवडणूकीपुर्वीच 252.16 कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या पैकी 50 कोटी रुपयांचा निधी सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हा विविध कलागुणांना वाव देणारा जिल्हा असून, जिह्यात इंजिनीअरींग असोसिएशन, आर्किटेक्ट असोसिएशन, डॉक्टर्स असोसिएशन, बार कॉन्सिल अशा विविध संघटना कार्यरत आहेत. परंतु या विविध संघटनांच्या सामुहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण तसेच जाहीर कार्यक्रम, बैठक, पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी शासनाचे अधिकृत कोणतेही केंद्र जिह्यात उपलब्ध नव्हते. यासाठी अत्याधुनिक सोई सुविधांनी युक्त असणारे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरात राजाराम तलाव येथे उभा करण्याची मागणी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी 9 जानेवारी 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य करून आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यास प्रशासकीय मंजुरी दिली होती. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासाठी राजाराम तलाव येथील जागा प्रस्तावित करण्यात आली. यानंतर दोन हजार प्रेषक क्षमतेचे अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहीतेच्या पुर्वसंध्येला आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा करत कन्व्हेन्शन सेंटरची प्रशासकीय मान्यता मिळवल्याने हे काम आचारसंहितेच्या कात्रीतून बाहेर सुटले. निवडणूकीनंतरही आमदार राजेश क्षीरसागर यांनी कन्व्हेन्शन सेंटरचा पाठपुरावा कायम ठेवला. नियोजन विभागाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधेची कामे करणे याअंतर्गत बुधवार (8 जानेवारी) 50 कोटीं रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यास पुन्हा यश आले आहे.
- कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूर मैलाचा दगड ठरणार
राजाराम तलाव येथील कन्व्हेन्शन सेंटर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उभारण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, उर्वरीत निधीही लवकरच प्रशासनाकडे वर्ग होणार आहे. कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरच्या विकासात मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.