आमदारांना प्रत्येकी 50 कोटी
मतदारसंघांच्या विकासकामांसाठी सरकारकडून विशेष अनुदान मंजूर : नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी/ बेंगळूर
मतदारसंघांच्या विकासकामांसाठी अनुदान मिळत नसल्याने आणि मंत्र्यांकडून प्रतिसाद दिला जात नसल्याने सत्ताधारी काँग्रेस पक्षातील आमदारांनी नाराजी उघड केली होती. आता या आमदारांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्यात आले आहे. मुख्यमंत्री पायाभूत सुविधा विकास योजनेंतर्गत हा निधी देण्यात आला आहे. याद्वारे आमदारांमधील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.
मतदारसंघांच्या विकासासाठी अनुदान दिले जात नाहीत, असा नाराजीचा सूर आमदारांमध्ये होता. आता याची दखल घेण्यात आली आहे. 2025-26 या सालातील राज्य अर्थसंकल्पात अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे मुख्यमंत्री पायाभूत सुविधा विकास योजनेंतर्गत विशेष अनुदान वाटप करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते व पुलांची कामे, ग्रामीण रस्ते, शहरी रस्तेकामांसाठी 37.5 कोटी रुपये आणि आमदारांच्या अधिकार कक्षेतून इतर खात्यांच्या कामांसाठी 12.5 कोटी रुपये खर्च करण्यास अनुमती देण्यात आली आहे.
अनुदानासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे 30 आणि 31 जुलै रोजी आमदारांची बैठक घेणार आहे. आमदारांना मागणीपत्रासह कामांच्या माहितीचा तपशिल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हानिहाय विधानसभा आमदारांची बैठक विधानसौधमध्ये बोलावण्यात आली आहे.
सत्ताधारी काँग्रेसमधील काही आमदारांनी अनुदान व मंत्र्यांच्या वर्तणुकीसंबंधी उघडपणे भाष्य केले होते. गॅरंटी योजनांमुळे विकासकामांना खिळ बसली आहे. मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देणे कठीण झाले आहे, अशी खंतही आमदारांनी व्यक्त केली होती. याची हायकमांडने याची गांभीर्याने दखल घेतली होती. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेवरून राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी दोन टप्प्यात आमदारांच्या तक्रारी व मागण्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मंत्र्यांशीही चर्चा केली होती. आमदारांमध्ये असणारा असंतोष दूर करण्यासाठी सिद्धरामय्या यांनी प्रत्येकी 50 कोटी रु. विशेष अनुदान दिले आहे.
सर्व आमदारांना सिद्धरामय्यांचे पत्र
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना अनुदान वाटपाबाबत पत्र पाठविले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयातूनही आमदारांना माहिती पाठविण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.