For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बळ्ळारी नाल्याच्या विकासासाठी 50 कोटींचा प्रस्ताव

12:00 PM Jan 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
बळ्ळारी नाल्याच्या विकासासाठी 50 कोटींचा प्रस्ताव
Advertisement

नाल्याचे काँक्रिटीकरण होणार, पालकमंत्र्यांचा पुढाकार : सतीश जारकीहोळी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन : शेतकऱ्यांतून समाधान

Advertisement

बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बळ्ळारी नाल्याच्या विकासासाठी 50 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्याचा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला आहे. तसेच शनिवारी पार पडलेल्या बुडाच्या बैठकीत बळ्ळारी नाल्याचे काँक्रिटीकरण करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याने रविवार दि. 19 रोजी शेतकऱ्यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी रविवारी येळ्ळूर रोडवरील बळ्ळारी नाल्याला धावती भेट दिली. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा त्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षांपासून बळ्ळारी नाला विकासाच्या प्रतीक्षेत आहे. परिसरातील हजारो एकर जमिनीतील पिके दरवर्षी पुराच्या पाण्यात बुडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे बळ्ळारी नाल्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, दरवर्षी शेतकऱ्यांना केवळ आश्वासनच दिले जात होते. त्यामुळे यंदा समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी पुढाकार घेत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निदर्शनास बळ्ळारी नाल्याचा प्रश्न आणून दिला.

इतकेच नव्हे तर भर पावसात पालकमंत्री जारकीहोळी यांनी पाहणी करून यंदा बळ्ळारी नाल्याचा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार बळ्ळारी नाल्याच्या विकासासाठी 50 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्याबाबत पालकमंत्र्यांनी राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला आहे. त्यातच शनिवारी पार पडलेल्या बुडाच्या बैठकीतही बळ्ळारी नाल्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. बळ्ळारी नाल्याचे काँक्रिटीकरण करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. त्यामुळे बळ्ळारी नाल्याचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागणार असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. रविवारी पालकमंत्री जारकीहोळी यांनी येळ्ळूर रोडवरील बळ्ळारी नाल्याची पाहणी करून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. कामाला सुरुवात करण्यापूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याचबरोबर पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनाही आवश्यक सूचना केल्या जाणार आहेत. यावेळी शेतकरी नेते कीर्तीकुमार कुलकर्णी, अमोल देसाई, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर आदींनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भेटीदरम्यान शशिकांत पाटील, राजू सावंत, शुभम जाधव, मनोज बिर्जे, विजय पाटील, संदीप पाटील, सागर गावडे, अजित पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.