‘अमृत‘मधील पाण्याच्या 5 टाक्या पूर्ण
कोल्हापूर :
अमृत योजना एकमधील 5 पाण्याच्या टाक्या उभारून पूर्ण झाल्या आहेत. यापैकी पुईखडी, आपटेनगर येथील टाक्यांची गुरूवारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून हायड्रॉलिक टेस्टींग घेण्यात आली आहे. या टाक्या लवकरच वापरात येणार असल्याने शहरातील बहुतांशी परिसरातील पाण्याचा प्रश्न तसेच जुन्या टाक्यातून वाया जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
अमृत योजना एकमधून कोल्हापूर महापालिकेला पिण्याची पाईपलाईन, पाण्याच्या टाक्यासाठी 115 कोटींच्या निधी मिळाला आहे. तर ड्रेनेजलाईन, एसटीपी प्रकल्पासाठी 80 कोटींचा निधी मिळाला आहे. यामध्ये पिण्याची पाईपलाईन आणि पाण्याच्या टाकीचे काम असणाऱ्या ठेकदाराकडून संथगतीने काम सुरू आहे. मुदत झाली तर काम झाले नसल्यान ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची नोटीस बजावली होती. यानंतर ठेकदाराने काम गतीने सुरू केले आहे. 12 पाण्याच्या टाक्या उभारल्या जाणार आहेत. यापैकी शिवाजी पार्क येथील टाकी सोडली तरी इतर टाकींचे काम सुरू झाले. यामध्ये पाच टाक्यांची उभारणी झाली आहे. यामध्ये मागील आठवड्यात कसबा बावडा फिल्टर हाऊस आणि सम्राटनगर येथील पाण्याची टाकी बांधून पूर्ण झाली. गुरूवारी पुईखडी, आपटेनगर, येथील टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे जिवबानाना पार्क, सम्राटनगर, सागरमाळ येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सायबर येथील टाकीचे काम अंतिम टप्प्यावर आहे. उर्वरीत सर्व टाक्यांची काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे टार्गेट असल्याची माहिती जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी दिली आहे.