For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

56 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी 5 जणांना अटक

06:07 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
56 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी 5 जणांना अटक
Advertisement

ईडीची मोठी कारवाई : आरोपींमध्ये अब्जाधीश उद्योजकाचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सुमारे 56 हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई करत पाच प्रमुख आरोपींना अटक केली आहे. मेसर्स भूषण स्टील लिमिटेड कंपनी आणि कंपनीशी निगडित अनेक संचालकांसमवेत अनेक जणांवर या घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी विस्तृत तपासाची प्रक्रिया पुढे नेत कंपनीशी निगडित पाच प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना न्यायालयासमोर हजर करत त्यांची कोठडी मिळविण्याचा ईडीचा प्रयत्न असणार आहे.

Advertisement

अजय मित्तल, अर्चना मित्तल, नितिन जौहरी (माजी सीएफओ), प्रेम तिवारी (माजी उपाध्यक्ष), प्रेम अग्रवाल (माजी उपाध्यक्ष) अशी या आरोपींची नावे आहेत. सुमारे 56 हजार कोटी रुपयांच्या या बँक घोटाळ्याप्रकरणी प्रारंभिक तपास एसएफआयओकडून करण्यात आला होता. तसेच आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यानंतर हे प्रकरण ईडीने स्वत:कडे घेतले आहे. आता मनी लॉन्ड्रिंगशी निगडित प्रकरणात तपास केला जात आहे.

या प्रकरणी ईडीने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीरज सिंघल समवेत त्याच्या अनेक सहकाऱ्यांच्या विरोधात तपास चालविला आहे. नीरज सिंघल आणि त्याच्या  सहकाऱ्यांनी अनेक बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या. बँकेकडून कर्जाच्या स्वरुपात प्राप्त रक्कम या बनावट कंपन्यांमध्येच वळविण्यात आली होती. तर पुढील काळात ज्या प्रकल्पाकरता कर्ज घेण्यात आले होते, तो नुकसानीत गेल्याचे दाखविण्यात आले होते.

याप्रकरणी बँकेकडून अनेक तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. याप्रकरणी एसएफआयओ आणि ईडीने तपास चालविला आहे. तपास यंत्रणेने 13 ऑक्टोबर रोजी दिल्ली, हरियाणा, कोलकाता, मुंबई, भुवनेश्वरसह अनेक ठिकाणी छापे टाकले होते. ईडीने 9 जून रोजी मेसर्स भूषण स्टील लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीरज सिंघलला अटक केली होती.

ईडीने एसबीआय आणि पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी अनेक अचल संपत्ती जप्त केल्या आहेत. कंपनीशी निगडित आसाम, रायगड, हरियाणातील फरिदाबादमध्ये सुमारे 61.38 कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली आहे. याचबरोबर छाप्यांदरम्यान ईडीच्या पथकाने सुमारे 72 लाख रुपये, 52 लाख रुपयांचे मूल्य असलेले विदेशी चलन, ट्रॅव्हल चेक, तीन आलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत.

Advertisement
Tags :

.