For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आज मतदानाचा अंतिम टप्पा

06:58 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
आज मतदानाचा अंतिम टप्पा
Advertisement

57 जागांवर निवडणूक : उत्तर प्रदेश-पंजाबच्या प्रत्येकी 13 जागांचा समावेश

Advertisement

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात शनिवार, 1 जून रोजी आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 57 जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सातव्या टप्प्यात 904 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये 809 पुरुष आणि 95 महिला उमेदवार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेत्री कंगना रणौत, टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी आणि भोजपुरी कलाकार पवन सिंग यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य या टप्प्यात ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

Advertisement

सातव्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे त्यात उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील प्रत्येकी 13, पश्चिम बंगालमधील 9, बिहारमधील 8, ओडिशातील 6, हिमाचल प्रदेशातील 4 आणि झारखंडमधील 3 जागांचा समावेश आहे. यासोबतच या टप्प्यात चंदीगडच्या एकमेव जागेवर मतदान होणार आहे. सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण होताच निकालाकडे लोकांचे लक्ष असेल. मंगळवार, 4 जून रोजी 543 पैकी 542 जागांचे निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत. तर गुजरातमधील सुरतमधून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, शनिवारी होणाऱ्या मतदानानंतर सायंकाळी मतदानोत्तर अंदाज विविध वाहिन्यांकडून जाहीर केले जाणार आहेत.

199 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे

एडीआरच्या अहवालानुसार, सातव्या टप्प्यातील एकूण उमेदवारांपैकी 199 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. तसेच 155 उमेदवारांवर खून, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 13 उमेदवार कोणत्या ना कोणत्या प्रकरणात दोषी ठरले आहेत. 4 उमेदवारांवर खुनाचे गुन्हे तर 21 उमेदवारांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. 27 उमेदवारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. 3 उमेदवारांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रक्षोभक भाषणे दिल्याप्रकरणी 25 उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

33 टक्के उमेदवार करोडपती

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील 904 उमेदवारांपैकी 33 टक्के म्हणजेच 299 उमेदवार कोट्याधीश आहेत. या उमेदवारांची सरासरी मालमत्ता 3.27 कोटी ऊपये आहे. भाजपचे सर्वाधिक 44 उमेदवार कोट्याधीश आहेत. पंजाबमधील भटिंडा येथील उमेदवार हरसिमरत कौर बादल या सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे 198 कोटी ऊपयांची संपत्ती आहे. या यादीत दुसरे नाव ओडिशातील भाजप उमेदवार बैजयंत पांडा (ऊ. 148 कोटी) आणि तिसरे नाव चंदीगडमधील भाजप उमेदवार संजय टंडन (111 कोटी) यांचे आहे. शिरोमणी अकाली दलाचे सर्व 13 उमेदवार, आम आदमी पार्टीचे सर्व 13 उमेदवार आणि बिजू जनता दलाचे सर्व 6 उमेदवार करोडपती आहेत. सपाच्या 9, टीएमसीच्या 8, काँग्रेसच्या 30 आणि सीपीआय-एमच्या 4 उमेदवारांकडे 1 कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती आहे.

सायंकाळी 6.30 पासून एक्झिट पोल अंदाज

मतदान आटोपल्यानंतर 1 जूनच्या संध्याकाळी विविध माध्यम वाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांद्वारे एक्झिट पोल जाहीर केले जातील. सातव्या फेरीचे मतदान संपल्यानंतर साधारणपणे वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल दाखवले जातील. यापूर्वी, निवडणूक आयोगाने 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7.00 ते 1 जून 2024 रोजी संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी घातली होती. त्यामुळे आता 1 जून रोजी संध्याकाळी 6.30 वाजल्यानंतर सर्व सर्वेक्षण संस्था किंवा वृत्तवाहिन्या एक्झिट पोल प्रसिद्ध करतील. देशात कोणता पक्ष सरकार बनवू शकतो? कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याचा अंदाज या पोलमधून येणार आहे.

विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोलही दाखविणार

लोकसभा निवडणुकीसोबतच चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही होत आहेत. यामध्ये आंध्रप्रदेश, ओडिशा, अऊणाचल प्रदेश आणि सिक्कीमचा समावेश आहे. या राज्यांचे एक्झिट पोलही 1 जूनला येतील. सिक्कीम आणि अऊणाचल प्रदेश या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 2 जूनला लागणार आहेत. तर, आंध्रप्रदेश आणि ओडिशामधील विधानसभा निवडणुकांचे निकाल 4 जून रोजी येतील.

Advertisement
Tags :

.