दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 5 टक्के आरक्षण द्यावे
गोवा दिव्यांग हक्क संघटनेची मागणी
पणजी : राज्यातील शाळा, उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे राज्यातील महाविद्यालयांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 5 टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात, अशी मागणी गोवा राज्य दिव्यांग हक्क संघटनचे अध्यक्ष अॅवलिनो डिसा यांनी केली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 5 टक्के जागा आरक्षित ठेवल्या तर अशा व्यक्तींना पुरेसा पाठिंबा मिळेल. दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्यास संबंधित शाळा, उच्च माध्यमिक व महाविद्यालयांवर दिव्यांग कायदा 2016 अंतर्गत कायद्यानुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते. प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्यांला कायद्यानुसार शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राज्यात असे प्रकार घडू नये यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आवाहन राज्य दिव्यांग हक्क संघटनेतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही वर्षांत दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांत प्रवेश नाकारण्याचे प्रकार राज्यात घडले आहेत. संबंधित पालकांनी अशा गोष्टी निदर्शनास आणल्यानंतर दिव्यांग आयोगाने अशा प्रकरणांत हस्तक्षेप केल्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. सद्या राज्यातील दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात असे प्रकार घडू नये, अशी मागणी होत आहे.