पिकनिकसाठी गेलेले 5 जण बुडाले
शिरसी तालुक्यातील शालमला नदीतील दुर्घटना : तिघांचे मृतदेह सापडले तर दोघे बेपत्ता
कारवार : रविवारी सुटी असल्याने पिकनिकला गेलेले पाच जण पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना शिरसी तालुक्यातील भैरुंबे जवळच्या शालमला नदीत (सहस्त्रलिंग परिसरात) घडली. बुडून बेपता झालेल्या व्यक्ती शिरसी येथील रामनबैल आणि कस्तुरबानगर येथील आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे बेपत्ता झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात आले. मौलाना मोहम्मद सलीम खलील रेहमान (वय 44), नादीयानूर अहमद शेख (वय 20), नबीलनूर अहमद शेख (वय 22), उमर सिद्दीकी (वय 14) (सर्वजण रा. रामनबैल) आणि मीसबा तब्बसुम (वय 21, रा. कस्तुरबानगर) अशी बुडून बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. यापैकी उमर आणि मीसबा विद्यार्थी होते असे सांगण्यात आले. या दुर्घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी की, शिरसी येथील रामनबैल आणि कस्तुरबानगर येथील 25 जण शालमला नदीतील सहस्त्रलिंग परिसरात पिकनिकसाठी गेले होते. त्यावेळी एक मुलगा खेळत असताना पाण्यात पडला. त्या बालकाला वाचविण्यासाठी मोहम्मद सलीम यांनी पाण्यात उडी टाकली आणि त्या बालकाला वाचविले. तत्पूर्वीच बालकाला वाचविण्यासाठी इतरांनीही पाण्यात उडी टाकली होती. बालकाला वाचविलेल्या मोहम्मद सलीम यांनी इतरांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला. तथापि मोहम्मद सलीम यांच्या प्रयत्नांना यश तर आलेच नाही आणि सलीमही इतरांप्रमाणे पाण्यात बुडून बेपत्ता झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बेपत्ता झालेल्यांचा शोध घेतला. घटनास्थळी बेपत्ता झालेल्यांचे नातेवाईक आणि मित्र मोठ्या संख्येने दाखल झाले होते. सलीम खलील रेहमान, नादीया आणि मीसबा या तिघांचे मृतदेह हाती लागले असून अन्य दोन बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. शिरसी ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.