For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेन्नईच्या ‘एअर शो’मध्ये 5 जणांचा मृत्यू

06:04 AM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
चेन्नईच्या ‘एअर शो’मध्ये 5 जणांचा मृत्यू
Advertisement

सदोष व्यवस्थापनामुळे घटना घडल्याचा आरोप, राज्य सरकारवर टीका

Advertisement

वृत्तसंस्था / चेन्नई

तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे भारतीय वायू दलाने आयोजित केलेला भव्य ‘एअर शो’ पाहण्यासाठी जमलेल्या नागरीकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 200 हून अधिक प्रेक्षक जखमी झाले आहेत. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करण्याचे उत्तरदायित्व तामिळनाडूच्या राज्य सरकारवर होते. मात्र, व्यवस्थापनात त्रुटी राहिल्याने ही शोकांतिका घडली असा आरोप आहे.

Advertisement

या एअर शोमध्ये भारतीय वायुदलाच्या 72 विमानांनी भाग घेतला होता. आकाशात विमानांच्या कसरती होत असतानाच खालून तो पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. प्रचंड उष्मा आणि दाटीवाटी यामुळे अनेक प्रेक्षक बेशुद्ध पडले. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य प्रकारे करण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक प्रेक्षकांना डीहैड्रेशनचा (शरिरात पाण्याची कमतरता) त्रास झाला. यामुळे अनेक प्रेक्षक बेशुद्ध पडले. अशा साधारणत: 300 प्रेक्षकांवर उपचार करण्यात आले. शरिरातील पाण्याच्या करतरतेमुळे पाच प्रेक्षकांचा मृत्यू झाला.

विरोधी पक्षांची टीका

भारतीय वायू दलाच्या 92 व्या एअर शोचा कार्यक्रम गेल्या अनेक महिन्यांपूर्वीच निर्धारित करण्यात आलेला होता. तामिळनाडू सरकारला याची पूर्ण कल्पना आधीच देण्यात आली होती. तथापि, राज्यसरकारने हा कार्यक्रम गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे व्यवस्थापनात गंभीर उणीवा राहिल्या. परिणामी ही शोकांतिका घडली, अशी टीका तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या अण्णाद्रमुक पक्षाने केली आहे. भारतीय जनता पक्षाचे तामिळनाडूतील नेते के. अण्णामलाई यांनीही राज्य सरकारवर जोरदार टीका केली. अद्रमुकने तर मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याकडून राजीनाम्याची मागणी केली. अकार्यक्षम मुख्यमंत्री आणि राज्य सरकारमुळे हा प्रसंग ओढविल्याचे प्रतिपादन दोन्ही पक्षांनी केले आहे.

आरोप फेटाळले

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी आरोपांचा इन्कार केला आहे. राज्य सरकारने या एअर शोसाठी जितते करता येणे शक्य होते, तितके केले आहे. तरीही ही दुर्घटना घडली. चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागविण्यात आला आहे. जखमींवर राज्य सरकारच्या खर्चाने उपचार करण्यात आले असून सर्व जखमींना घरी जाऊ देण्यात आले आहे. विरोधी पक्ष या घटनेचा बाऊ करीत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

काय त्रुटी राहिल्या...

राज्य सरकारने प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था योग्य प्रकारे केली नव्हती. त्यामुळे मैदानाच्या एका भागात मोठी गर्दी झाली. सध्या चेन्नईत उष्मा मोठ्या प्रमाणात आहे. लोकांनी एकाच ठिकाणी गर्दी केल्याने उकाड्याने अनेकजण बेशुद्ध पडले. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे अनेकजण ताहनेने व्याकूळ होऊन त्यांची प्रकृती बिघडली. लोकांना जाहीर सूचना करण्याची व्यवस्था सदोष होती. त्यामुळे लोक बेशुद्ध पडू लागल्यानंतर पळापळ झाली. गर्दीला योग्य मार्गदर्शन करण्याची व्यवस्था असती तर लोक लवकर घटनास्थळाहून बाहेर पडू शकले असते. मात्र, व्यवस्थापन करण्याऱ्या विविध घटकांचा एकमेकांशी संपर्क नव्हता. परिणामी दुर्घटनेची तीव्रता वाढली. अशा प्रकारचे गर्दी

खेचणारे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करताना  ज्या नियमांचे पालन प्रशासनाला करावे लागते, ते करण्यात आले नाहवी, अशी टीका तज्ञांनी केली. मात्र, वायूदलाशी या कार्यक्रमाच्या आधी चर्चा करण्यात आली होती. वायूदलाने ज्या आवश्यकतांची पूर्तता करण्याची मागणी केली होती, त्या पूर्ण करण्यात आल्या होत्या, असा दावा सोमवारी घटनेनंतर तामिळनाडू सरकारने केला आहे.

Advertisement
Tags :

.